१४ मार्च २००६
होयीची कथा काय सांगू राजेहो
कराले गेलो एक अन झाल भलतच राजेहो.
या वर्सी होती आमची पैलीच होयी
कितीतरी अरमान होते माया मनी
म्हतलं बायकोले पैल्या होयीले
तयार रायजो माया रंगात रंगाले
बायकोबी म्हनली पाहू किती हाये कोनात दम
म्या बी म्हतलं देशमुख नाई "किसीसे कम"
होयीचा दिवस आला तसं मले भाय झ्याक वाटलं
बायकोखातर यावर्सी पहिल्यांदा पाट्यावर पुरणबी वाटलं
तुपाची गोठ निंगाली तस मले एकदम आठोलं
मांगच्या वक्ती दुकानातुन तुपच नव्हतं आणलं
म्या म्हतलं बायकोले धा मिन्टात घेउन येतो तुप
भरवतो तुले पुरनपोळीचा घास, मजा येइन खुप
त्याच्यावर बायको अशी काही लाजली
मायी इच्छाच नाही होवे तुपाले जाची
मनातल्या इच्छा मनातच ठेवल्या अन घेउन आलो तुप
रस्त्यात मले आठवत होतं बायकोच गोरपान रुप
घरी येउन पायतो तं वेगळाच रंग दिसला
बायकोसंग सायी (साळी) अन साया (साळा) होता बसला.
म्या म्हतलं इचीभन हे भलतच कसं झालं
माय नशीब आजच एकदम असं कसं फुटलं
बायकोले रंग लावाचे सपन सपनच रायले
नस्त्या वक्ती हे दोघं कायलेच आले.
दुस-या दिवशी लौकर उठुन कलर लावाच ठरवलं
तवाच मले रात्री झोपेनं कवेत घेतलं
पायटे उठुन पायलं तं साया घोरत होता,
बायको सडा टाकत होती, मले चान्सच भेटला.
पुडीतला कलर हातात घेतला, थोडसं पानी टाकुन मस्त भिजवला,
मागुन जाउन बायकोच्या गळ्यात हात टाकला,
धा रुपयाचा अख्खा कलर तिच्या चेह-याले घुसाडला,
अन कशी दिसते पाहाले, चेहरा मायाकडं पलटवला,
मले वाटलच नव्हतं का असं काई होईन,
को-या चेह-याने बायको तिच्या मागुन येईन,
मले समजलच नाई का हे कन्फुजन कसं झालं
सायीनं बायकोची साडी नेसली हे ध्यानातच नाही आलं,
बायकोचा चेहरा असा लाल झाला,
बापजन्मी कोनी असा कलर नसन पायला,
मंग काय सांगु, काय झाली मायी हालत,
सायी होती चिडली, अन बायको होती रडत,
आता तं तिले कारणच होतं सापडलं
गुंडभर पानी माया डोस्क्यावरती उबडलं
आता काय कराव मले समजे नाई
समजवाचा चानस थे मले काई देये नाई
तिकडं सायी बी चिडली अन साया बी
देल्ला नाई चान्स पयुन जाचा बी
कलरच्या नावानं दोघान मले जो घोयसलं
थ्या दिवशी पाटलाचं पानी मीनं वयखलं
हाड नाही मोडलं, नशिब होतं चांगलं
पण वाटत होतं अजुनही बायकोच भेव,
दुपारच्याले साया-सायी गेले निगुन गावाले,
अन चानस भेटला मले बायकोशी बोलाले,
तिच्या चेह-यावर अजुनहि लाल रंग दिसत होता,
माया चेह-याचा त रंगच उडला होता,
तिच्या बहिणीनं तिची साडी नेसली
यात मायी काय चुक घडली ?
माही चुक नसताना मलेच भेवाडे,
अन समजवाले गेलो का डोळेच काढे...
शेवटी कान पकडुन "स्वारी" म्हटलं
तवा तिच्या चेह-यावर हासू दिसलं
तिले एकदम का सुचल काय म्हायित,
झट्कन उठुन थे आतमधं गेली
कवा तिनं गुलाल आणला पताच नाही लागला,
अन माह्या चेहरा लालेलाल करुन टाकला
मलेबी मंग असा जोश चढला
मीनंबी तिचा चेहरा मस्त रंगवुन काढला,
रातच्याले जवा तिनं भरवला घास पुरणपोळीचा,
समजला अर्थ मले बायकोच्या प्रेमाचा.