शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २००९

मैत्रीण

कुर्ला - हावडाच्या मासळीच्या वासाने भरलेल्या डब्यातला १४ तास प्रवास आणि पुढे धामणगाव ते घाटंजी २ सीटवर तिघांनी बसून केलेला बिड्यांच्या धुरात केलेला ३ तासाचा प्रवास... अगं आई गं... मला अक्षरशः जीव नकोसा झाला होता. त्या गर्दीतून दोन जड बॅग्ज कुणालाही लागू न देता बसबाहेर कश्याबश्या काढल्या आणि मोकळ्या हवेत श्वास घेतला. ऑटोत बॅग टाकून त्याला "ग्रीन कॉलनी" सांगितले आणि जरा मागे रेललो.

ही माझी नोकरी लागल्यानंतरची पहिली दिवाळी. साहजिकच सर्वांसाठी काहिनाकाही घेतल्यामुळे बॅग्ज जड झाल्या होत्या. खड्ड्यातून उसळणाऱ्या ऑटोतही त्यांना सांभाळणे कठिणच होते.

"इतक्या लौकर रस्ता खराब झाला ? " मी ऑटोवाल्याशी काहीतरी बोलायचे म्हणून विचारले.

"कापसाच्या गाड्या जातात ना, ते रस्त्याची वाट लावतात. इथं सिमेंट रोड जरी बनवला तरी काही उपयोग नाही" त्याने उत्तर दिले. शेवटी एक गचका देऊन ऑटो बंद पडला तो माझ्या घरापुढेच.

"विजुकाका.... " मैथिली ओरडतच बाहेर आली. मी ऑटोतून सामान काढलं तशी ती मला बिलगली. मग माझ्या घरात जात ओरडली, "आज्जी.... विजुकाका आला.... ". मग पुन्हा बाहेर येऊन स्वतःच्या घरी जात पुन्हा ओरडली, " आई, विजुकाका आला गं..... ".

मी घरात सामान ठेवेपर्यंत आई पाणी घेऊन आली होतीच. मी पाणी पिलं आणि "गरम पाणी आहे का, अंघोळ करतो, मगच बरं वाटेल" असं म्हणालो.

"आधी चहा घे मग कर अंघोळ" आईने आल्याआल्या सूचना दिली.

"हं. ठीक आहे" असं म्हणत मीही स्वैपाकखोलित शिरलो.

"बाबा कुठे गेले? " मी चौकशी केली.

"गेले संजुकडे, सत्यनारायणासाठी. तू आधी कळवलं असतं तर थांबले असते"

"हं. संजुताईकडे आहे हे माहीत असतं तर आधी तिच्याचकडे गेलो असतो. यवतमाळवरुनचतर आलो मी."

"येतीलच उद्या सकाळी". असं म्हणत मला चहा दिला.

मी चहा घेऊन अंघोळ उरकली. देवाला आणि आईला नमस्कार केला, तशी मैथिली आली. तिने माझ्यासोबत जेवण उरकलं आणि मी आडवा झालो. प्रवासाच्या थकव्यामुळे मला गाढ झोप लागली ती साडेपाचपर्यंत.

जेंव्हा आईनं उठवलं तेंव्हा डोळे जड झाले होते.

"मी जरा देवळात जाऊन येते. बाहेर जाशील तर कुलूप लावशील, ही घे चाबी. " असं म्हणत हातात चाबी ठेवली. मी अर्धवट झोपेत हूं. हूं.. करत होतो.

"नीट लावशील कुलूप..... अरे हो तुला सांगायचंच राहिलं होतं.... तुझी ती मैत्रीण येऊन गेली इथे, आठ दिवस खूप छान गेले आमचे .... फार गोड पोरगी आहे ती... बरं चल मी निघते....." बाहेरून मैथिलीचा आवाज आला, आणि मग मैथिली "चल ना गं आज्जी लौकर" म्हणत तिला ओढत घेऊन गेली.

मी पुन्हा डोळे मिटले. ५ मिनिट झाले असतील कदाचित, मी एकदम खाडकन उठलो. "माझी मैत्रीण ? आणि इथे ? घाटंजीत येऊन गेली ?" मी फाटकापर्यंत धावत गेलो पण आई निघून गेली होती.

"छ्या ! मी काहीतरी उगाच ऐकलं असेल... " असा विचार करून मी फ्रेश झालो. संध्याकाळी गावाबाहेर फिरायला जाणे हा माझा घाटंजीत असतांनाचा नेहमीचा क्रम होता, पण मुंबईत गेल्यापासून जरा फिरणं कमी झालं होतं. मी गावाबाहेर आलो. इथे एक गणपतीचं छोटसं मंदिर आहे. याच्या मागच्या बाजूला गव्हाचे शेत आहे. तिथून येणारी थंडगार झुळुक अंगावर घेतली की मन शांत वाटते. माझे डोळे आपोआप मिटले. माझी छान समाधी लागली होती.

"हाय ! " कुणीतरी म्हणालं तसं मी भानावर आलो. बघतो तर काय पुढे रवी उभा. माझा बालमित्र.

"अरे तू कुठे ? "

"यवतमाळला जाऊन येतो. ताईला आणायचं आहे. "

"अच्छा! "

"चल निघतो" त्याने कॅलिबरला किक मारली आणि गिअर टाकत म्हणाला, " अरे हो, तुझी मैत्रीण छान आहे यार. मस्त गप्पा मारल्या आम्ही"

"माझी मैत्रीण ? " मी काही पुढे बोलायच्या आतच तो निघून गेला.

"म्हणजे आई म्हणाली होती ते खरं होतं तर.... पण माझी कोणती मैत्रीण आली होती? आई म्हणाली की चार- आठ दिवस राहून गेली. इतक्या जवळची तर कोणीच नाही... आणि रवीशी गप्पा.... ज्याला आजपर्यंत कोणत्याही मुलीशी बोलणं जमलं नव्हतं तो गप्पा मारल्या म्हणतोय .... आहे तरी ही कोण.... आणि घाटंजीसारख्या छोट्याश्या गावात आठ दिवस .... नक्की गडबड आहे...... " मी विचार करतच घर गाठलं. मनात प्रत्येक मैत्रिणीबद्दल विचार करणं चालू होतं.
************************************************************************************

"आई, माझी कोणती मैत्रीण आली होती गं? " मी घरात शिरतच पहिला प्रश्न विचारला.

"वांग्याची भाजी खाशील ना? " सरळ उत्तर देईल ती आई कसली.

"हो" मी बोलून गेलो. तसही घराबाहेर राहिलं की कोणतीही भाजी सारखीच लागते. ती स्वैपाकघरात शिरली, तसा मी ही तिच्यामागे गेलो आणि डायनिंग टेबलवर बसलो.

"माझी मैत्रीण आली होती म्हणे! " मी पुन्हा मुळपदावर आलो.

"हो. अरे ती अमरावतीची नाही का... " तीला नाव आठवत नव्हतं.

"राणी, मुग्धा, पल्लवी, रोशनी, प्रीती, माधवी, सुधा, स्वाती.... " मी तिच्यासमोर लिस्टच वाचली.

"नाही रे, ह्या सगळ्या माहीती आहे मला. "

"मग कोण? "

"हं, आठवलं... श्रुती... किती गोड नाव आहे नं? "

"गोड... हुं... " मी स्वतःशीच बोललो. कारण ह्या नावाची माझी कोणी मैत्रीण आहे हे मला आठवतच नव्हतं. पण 'श्रुती' माझी कोणी मैत्रीण असू शकते, असही मला मनात वाटलं. कोणाला नाही आवडणार, अश्या नावाची मैत्रीण असायला.

"तिचं आडनाव, पत्ता, फोन, काही...? "

"ती तुला निवडुंगची हिरोईन आठवते... "

"अरे देवा, ही आई म्हणजे नं" मी मनाशी म्हणालो. आईला मध्येच काहीही सुचते.

"तीचा काय संबंध? " मी नाराजीने म्हणालो.

"अरे तिचं आडनाव तेच आहे"

"अच्छा! असं होय. " मी आता मात्र आईचं मनात कौतुक केलं. नशिब की मी 'निवडुंग'चा फॅन होतो. पण ही श्रुती जोगळेकर कोण, हे मला अजून समजलं नव्हतं. पण हे आईला कसं विचारणार?

"ती कशी काय आली होती गं? " मी जसं काही तीला लहानपणीपासून ओळखतो, अश्या थाटात मी विचारलं.

"अरे तीच एम.फिल. का पी.एच.डी.च काहीतरी रीसर्चच काम होतं. मला काय समजते त्यातलं. "

"रीसर्च? " मला आश्चर्य वाटलं.

"हो. तुझ्या कॉलेजच्या लायब्ररीत जाउन अभ्यास करत होती. बाबांनी ओळख करून दिली होती लायब्ररिअनची. "

मला आता आश्चर्य वाटल ते आमच्या कॉलेजचं. तशी आमच्या कॉलेज लायब्ररीत अगदी एम. एस्सी. ला वापरता येतील अशी दर्जेदार पुस्तकं होती. मी स्वतः एम. एस्सी. ला असतांना वापरली होती, पण रिसर्च... कमाल आहे...

"तिने फोन नंबर दिला का ग? " काही क्लू मिळावा म्हणून विचारलं.

"आहे ना, बाबांच्या डायरीत... " भाजीला फोडणी देत ती म्हणाली. मला एकदम ठसका बसला, फोडणीचा नव्हे डायरीचा. कारण बाबा प्रत्येक नवीन डायरी त्यांच्या जुन्यापुराण्या लेदर-बॅगमध्येच ठेवायचे. बारश्यापासून ते तेरवीपर्यंत कोणताही प्रसंग असो, सगळीकडे ती लेदर-बॅग त्यांच्या सोबतच राहणार.

"हुं. डायरीत.... " मी निराशेने म्हणालो. अन मला एकदम आठवलं, एम. एस्सी. ला असतांना डायऱ्या लिहायचो. आता आईने त्या डायऱ्या कुठे ठेवल्या देव जाणे. आईला विचारलं तर म्हणाली, असतील तिथेच.

आमच्याकडे बाबांचे इंग्लिश, संजुताईचे मराठीचे, मंजुचे बायोलॉजी तर माझे फिजिक्सचे असे मिळून दोन-अडिचशे पुस्तकं असतील. नोटस, झेरॉक्स वेगळ्याच! बॉक्सचा दीवाण पुर्ण या पुस्तकांनिच भरला आहे, त्यातच बिचाऱ्या माझ्या डायऱ्या कुठेतरी पडल्या असतील. अर्धा तास शोधाशोध केली तेंव्हा चारही डायऱ्या सापडल्या. त्यावरची धुळ झटकली आणि पहिली डायरी हातात घेतली तर आईची जेवायची सुचना. कसंबसं जेवण उरकलं आणि पहिली डायरी हातात घेतली. मी एम. एस्सी. ला ऍडमिशन घेतली त्यादिवशी भेटलेला मुकेश, स्वाती आणि अजय... दोन-चार पानं झाली नसतील तोच लाईट बंद. काही बोललो तर, आई म्हणाली, झोप आता. आजच आलाय, उद्या वाच आता. "

दातात फसलेला आंब्याच्या कोयीचा केस जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत मन त्यातच अटकून राहतं तसच माझं झालं होत. मी रात्रभर विचार करत होतो, ही श्रुती जोगळेकर कोण?

*************************************************************************************
दातात फसलेला आंब्याच्या कोयीचा केस जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत मन त्यातच अटकून राहतं तसच माझं झालं होत. मी रात्रभर विचार करत होतो, ही श्रुती जोगळेकर कोण?

साहजिकच रात्री उशिरापर्यंत जागल्यामुळे सकाळी उशिरा उठलो. चहा-नाश्ता उरकून पुन्हा पहिली डायरी हातात घेतली तर मैथिली आली.

"तू अजून आंघोळ नाही केली? यॅक बापा... मी पहा, पहिला नंबर तु कातीन किडा... " असं म्हणत जोरजोरात हसू लागली. तितक्यात आईने 'पाणी गरम झालय रे, अंघोळ उरकून घे' असं म्हणताच 'माकडाच्या हाती कोलित'च मिळाल. मी स्वैपाकघरात शिरलो तर आई ओवाळायची तयारी करत होती.

"ओवाळायचं? आजच? दिवाळीला अजून २ दिवस आहेत न ? "

"आता तु येतोच किती दिवसासाठी ? म्हणतात ना 'साधु-संत येती घरा तोची दिवाळी-दसरा' तसच आता तुझ्या बाबतीत म्हणाव लागेल"

"आज्जी ! विजुकाका साधु-संत झाला ? मला माहितीच नव्हतं. श्रुतीताईला तर मी हे सांगितलच नव्हतं" असं म्हणत ती फिदीफिदी हसू लागली. पुन्हा एकदा श्रुतीचं नाव आलं अन माझं डोकच तडकलं. एकतर ही श्रुती कोण हे अजून मला समजलं नव्हत आणि ही पोरगी मला अजून चिडवत होती. मी तिला पकडायला धावलो पण ती पळाली.

मी कशीबशी अंघोळ उरकली आणि अथर्वशीर्ष उरकून डायरी हातात घेतली. एक डायरी संपेपर्यंत जेवणाची वेळ झाली होती. पण श्रुतीचा पुसटसाही उल्लेख त्या डायरीत नव्हता. जेवण झालं आणि मी अधाश्यासारखी दुसरी डायरी हातात घेतली, तोच रवीचा आवाज आला. मलाही त्याच्याशी खुप गप्पा करायच्या होत्या. मुंबईत मी केलेल्या धमाल मजा सांगायच्या होत्या, पण झालं उलटच. माझी जुजबी चौकशी करून त्याने विचारले,

"श्रुतीला फोन केला की नाही ?"

"नाही, फोन नंबर बाबांजवळ आहे. " मी नाराजीने म्हटले.

"अच्छा. पण बाकी काही म्हण ही तुझी मैत्रिण खुप बोलकी आहे. अरे मी तिच्याशी केंव्हा गप्पा करायला लागलो मलाच कळल नाही. " त्यानंतर त्याचं जे 'श्रुती-पुराण' सुरू झालं, की बस रे बस... मी मात्र मलाच माहिती नसलेल्या मैत्रीणीबद्दल 'हुं हुं' करत होतो. त्यात भर पडली ती माधुरीवहिनींची. त्यांना म्हणे त्यांची कोणी जुनी मैत्रीणच भेटल्यासारखी वाटत होती. त्यात आमच्या मांसाहेबांची भर. 'हो ग ! किती गोड पोरगी आहे ती'. मी कितीही डोकं खाजवलं तरी मला कळत नव्हतं ही कोणती माझी मैत्रीण आहे. त्यात शेजारी-पाजारी मला माहीती नसलेल्या माझ्या मैत्रिणीचे गोडवे गात होते. त्यामुळे माझी अधिकच चिडचिड होती होती. कॉलनीत फिरणंसुद्धा कठीण झालं होतं. चला आज बाबा येणार होते. त्यांच्या डायरीतला तिचा पत्ता आणि फोन नंबर पाहीलं की कदाचित आठवल मला. बाबा आले की त्यांना सरळ डायरी मागायची आणि फोन करून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा असं मी ठरवलं. पण अजून बाबा आले नव्हते. आज संध्याकाळी फिरायला जायच रद्द करायचा विचार होता पण माधुरीवहीनी, नंदुभाउ उगाच मला त्रास देतिल असं वाटलं म्हणून मी बाहेर पडलो.

रात्री आठला परत आलो तरी बाबा आले नव्हते. पुन्हा मी उरलेल्या डायऱ्या काढल्या आणि वाचायला सुरुवात केली. रात्री पावणेबारा वाजले तेंव्हा दार वाजलं. बाबा आले होते. गाडी मध्येच बिघडल्यामुळे आणि दिवाळीच्या गर्दीमुळे दुसरी गाडी न मिळाल्यामुळे उशिर झाला होता. आता इतक्या रात्री त्यांना डायरी मागणं मला प्रशस्त वाटलं नाही. आणि नंबर मिळुनही इतक्या उशीरा फोन थोडीच करणार होतो?

ती ही रात्र तशीच गेली. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मी आळश्यासारखा १० वाजता उठलो. बघतो तर काय बाबा पुन्हा गायब ! मला वाटलं बाजारात गेले की काय. आईला विचारलं तर म्हणाली,

" अरे अंजीचे पांडे माहीती आहे न तुला ?"

" त्यांचं काय? " आईची गाडी पुन्हा भरकटली की काय असं मला वाटलं.

"त्यांचा मुलगा आला होता. लग्नाची बोलणी करायची आहे आणि मुहुर्त काढायचा होता म्हणून गाडीवर घेउन गेला, येतील जेवायच्या वेळेपर्यंत ! "

मी एक मोठा सुस्कारा सोडला. त्यापेक्षा जास्त मी त्यावेळी काहीही करू शकत नव्हतो. मी चहा घेउन उरलेली माझी अर्धी डायरी संपवली. चार डायऱ्या, फोन नंबरच्या डायऱ्या, माझी डिजिटल डायरी सगळं काही शोधून झालं. इतकच नाही तर दोन - चार एम. एस्सी. च्या मित्रांनाही फोन करून झालं, पण श्रुती कोण हे मला अजुनही समजलं नव्हतं.

जेवायच्या वेळेपर्यंत बाबा आलेच नाही, त्यामुळे माझी चिडचिड अधिकच वाढली होती.

" करा , दुसऱ्यांच्या मुलांचे लग्न करा, त्यांच्या घरी बारश्याला जा.... स्वतःचा मुलगा लग्नाचा झालाय हे काय मी सांगायचं का?" मी मनाशीच बडबड करत होतो. शेवटी मला न आवडणारी भेंडीची भाजी खाल्ली हे मला भाजी संपल्यावर कळलं. शेवटी मी फस्ट्रेट होउन झोपून गेलो. रात्री झोप न झाल्यामुळे कदाचित असेल, मला गाढ जोप लागली. मी उठलो तेंव्हा ५ वाजले होते. बाबा चहा घेत होते. मलाही चहाची खुप गरज होती. चहा घेता-घेता बाबांनी लग्नाच्या बोलणीत झालेली गंमत सांगितली तसं मी पोट धरून हसू लागलो. अचानक बाबांना काहीतरी आठवलं. त्यांनी स्वतःची बॅग काढून डायरी माझ्यासमोर धरली. ते नंदुभाऊंनी बघितलं. त्यांनी चान्स सोडला नाही.

"डायरी मिळाली वाटते. "

मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. 'जे' च पान काढलं. त्यात काळ्या शाईच्या पेनने टपोऱ्या मोत्यासारख्या अक्षरात लिहिलं होतं, "कु. श्रुती अरुण जोगळेकर ", पुढचा पत्ता वाचताच मी अधिकच गोंधळात पडलो. "बुधवारा, अमरावती".

'बुधवारा', अमरावतीचा अतिशय जुन्या वस्तीचा भाग. या भागात नवीन व्यक्तीला एखाद्याच्या घरी जातांना जसा पत्ता विचारावा लागतो तसा तिथून परत येतांनाही विचारावा लागतो इतका गल्लिबोळाचा भाग. अमरावतीला चार वर्ष होतो पण या भागात कधी जायचं कामही पडलं नाही, आणि इच्छाही झाली नाही.

मी अमरावतीच्या सगळ्या मैत्रीणींकडे कोणत्या ना कोणत्या कारणाने जाउन आलो होतो, पण बुधवाऱ्यात जायच कधिच काम पडलं नव्हतं. पत्ता मिळुनही, माझा प्रश्न तसाच होता,

"ही श्रुती जोगळेकर कोण?"
************************************************************************************
" बाकी काही म्हणा, विजू आल्यापासून काकु फ्रेश दिसत आहे, नाही का माधुरी ? " नंदुभाऊंनी म्हटले.

" मग काय ? एकुलता एक लेक आहे तो. तसही श्रुती गेल्यापासून काकुंना करमत नव्हतं" वहीनी म्हणाल्या.

" खर आहे ग तुज. लळा लावला पोरिनं ८ दिवसात. फारच गोड पोरगी आहे" आई एकदम तिच्या आठवणींनी भावुक झाली होती.

"पण ही श्रुती आहे तरी कोण ? " माझ्या तोंडून अचानक निघून गेलं.

"घ्या. म्हणजे आता तुला हे ही आठवत नाही ? " बाबा म्हणाले.

"अरे ती तुझी मैत्रीण आहे न ? " आईने घाबरून विचारलं.

"मला नाही माहित. " मला काय बोलाव ते सुचलच नाही.

"म्हणजे तुला हे म्हणायचं आहे की तु तिला ओळखत नाही ? " नंदुभाऊ वकिलासारखे विचारू लागले.

"मी खरच तिला नाही ओळखत "

"मग ती इथे कशी आली? आणि तिला तर तुझ्याबद्दल सगळच माहिती होतं, अगदी नाटकं, क्विझ, इलेक्क्षन, सगळं काही. तुला आठवत नसेल कदाचित" आई म्हणाली.

"नाही ग आई, मी खरच ओळखत नाही तिला. मी माझ्या सगळ्या डायऱ्या बघितल्या, माझ्या मित्रांनासुद्धा विचारलं. " माझा आवाज रडवेला झाला होता.

आता मात्र आई-बाबा घाबरले. माझी मैत्रीण म्हणून आलेली मुलगी होती तरी कोण ? त्यांनी १५-२० मिनिटं वेगवेगळे प्रश्न विचारून मला भंडावून सोडलं. त्यांचा माझ्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता.

"आता मी काय करू म्हणजे तुमचा विश्वास बसेल? " मी शेवटी चिडून म्हणालो.

"फोन कर" वहिनी म्हणाल्या.

"फोन ? कुणाला ? "

"श्रुतीला. "

"आणि काय बोलु? "

"तू फोन तर कर, कदाचित तिच्याशी बोलल्यावर आठवेल तुला. "

मला हे पटलं. मी फोन लावला.

"नमस्कार, जोगळेकर बोलतोय" तिकडून एक जाडाभरडा आवाज आला.

"नमस्कार. मी विजय देशमुख बोलतोय, घाटंजीवरुन. श्रुती आहे का ? "

"एक मिनिट हं विजयराव" मला त्यांनी विजय'राव' म्हटलं याचं आश्चर्य वाटलं. माझा आवाज चाळीशीचा वाटला की काय ?

"हॅलो" पलिकडून एक नाजुक आवाज आला.

"हॅलो श्रुती मी विजय बोलतोय, घाटंजीहुन" मी कसाबसा बोललो.

"अय्या तुम्ही ! तुम्ही कधी आलात ? " आता आश्चर्यचकीत होण्याची माझी पाळी होती.

"झाले २ दिवस"

"२ दिवस आणि आत्ता फोन करत आहे? " काय चालयय हे, हि पोरगी अशी काय बोलतेय, मी अजुनच गोंधळात पडलो.

"नाही म्हणजे तुझा नंबर बाबांजवळ होता आणि बाबा बाहेरगावी गेले होते म्हणुन.... "

"अस्सं, ठीक आहे"

"श्रुती, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं" मी मुळ मुद्द्यावर आलो.

"मलाही तुमच्याशी खुप बोलायच आहे पण मला आत्ता निघायला हवं. शरयुचा वाढदिवस आहे ना आज, म्हणून ती सगळ्यांना पिक्चरला नेतेय. सगळ्याजणी माझ्यासाठी थांबल्या आहे, मी जाउ? "

ही पोरगी इतकी लाडीक का बोलत आहे, आणि शरयू कोण, आणि मला जाउ म्हणून का विचारते आहे ? ही तर अशी बोलत आहे जसं काही माझं हिच्याशी लग्न ठरलं आहे. ओह माय गॉड, आई-बाबांनी मला न विचारता माझं लग्न तर नाही ना ठरवल? मी त्यांच्याकडे पाहिलं पण तसं काहिच मला जाणवलं नाही.

"आपण उद्या बोललो तर चालेल न ? " तिने पुन्हा विचारले.

"ठीक आहे, उद्या बोलु" असं म्हणून मी फोन ठेवला. 'पिक्चरला गेली, उद्या बोलेल' मी सर्वांना सांगितले.
**********************************************************************************

तीही रात्र अशीच गेली. मात्र दुसऱ्या दिवशी मैथिलिने सकाळी सकाळीच त्रास देणे सुरू केले. जशी मांजर बिछान्यात घेउन घुसघुस करते तशी तिही घुसली आणि माझी झोप उडवली.

"लौकर ब्रश कर, आज मी तुला उटणं लावून तुला गोरगोरं करणार आहे" तीची ऑर्डर सुटली. पुढचा तास दिड तास तिच्या मस्तीतच गेला. पण मी तयार झालो तेंव्हा मला चांगलीच भुक लागली होती. किचनमध्ये बघितल तर काय....

आज वसुबारस. दरवर्षी वसुबारसला आई पांढऱ्या ज्वारीची भाकरी आणि वांगे-बटाट्याची रस्स्याची भाजी बनवते. माझ्या तोंडाला पाणी सुटलं. व्वा ! मी लगेच पानं घ्यायला सुरुवात केली. आई मला जेवायला वाढणार इतक्यात बाहेरून मैथिली ओरडतच आली.

"आज्जी, श्रुतीताई आली"

"श्रुती? " आईने आश्चर्याने विचारले.

"हो, श्रुतीताई आली' तिने पुन्हा एकदा धापा टाकत म्हटले. मी किचनमधुनच वाकून पाहिले. मधल्या दाराच्या पडद्यामुळे मला फक्त लॅवेंडर रंगाचा पंजाबी सुट दिसला. मी मधल्या खोलीत जाउन कपडे बदलले, केस नीट केले. भलेही मी ओळखत नसलो, तरी माझी मैत्रीण होती ती.

मी पाणी घेउन गेलो. बाहेर २२-२३ ची एक तरुणी आणि एक मध्यमवयीन गृहस्थ होते. ते म्हणाले,

"नमस्कार, मी अरुण जोगळेकर, आणि श्रुतीला तुम्ही ओळखताच. "

मी श्रुतीकडे बघितले, पण तिचा चेहरा ओळखीचा वाटत नव्हता. मलाच अवघडल्यासारखं झालं.

तितक्यात मैथिलीने नंदुभाऊंना आवाज दिला,

"मांडे सर तुम्हाला माझे आबा बोलवत आहे" ते ऐकून श्रुती एकदम गोड हसली. मला आईचं 'गोड मुलगी' हे विषेशण पटलं.

बाबांनी नंदुभाऊंची ओळख करून दिली, "तसे हे आमचे शेजारी पण आमच्यासाठी आमचा मोठा मुलगा".

"हो श्रुतीने सांगितलं मला".

" काय रे आता तरी ओळखलं की नाही."

"आय ऍम सॉरी पण मला... आय मीन मी... " मला काय बोलाव तेच सुचल नाही.

"नाही, तुम्ही मला ओळखत नाही, पण मी तुम्हाला ओळखते. " श्रुती म्हणाली. माझी स्मरणशक्ती चांगली असल्याबद्दल मला थोडं बरं वाटलं. पण बाबा नंदुभाऊ आणि मधल्या खोलिच्या दरवाजात्यात उभी असलेली आई, सगळेच चकीत झाले.

"तू मला ओळखते ? कसं काय? " मी विचारलं.

"मी स्वप्नाची, तुमच्या जुनिअरची मैत्रीण आहे."

स्वप्ना माझी जुनिअर असली तरी माझी बेस्ट फ्रेंड होती. रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने आमचे वाद व्हायचे. खरं तर ती मुद्दाम वाद घालायची. म्हणायची "सर, तुमच्याशी वाद घातला की तुम्ही अजून ती गोष्ट पटवून देता, त्यामुळे मला आणखी काही नवीन गोष्टी कळतात." एम. एस्सी. नंतरही २ वर्ष मी तिथेच नोकरी केली, त्यामुळे ३ वर्षात आमची मैत्री अधिकच घट्ट झाली. माझ्या डोळ्यासमोरून ती ३ वर्ष सरकली.

"ती रोज मला तुमच्याविषयी सांगायची. तीच्या गप्पांमध्ये तुमचाच जास्त समावेश असायचा. पण मागच्या वर्षी तीच लग्न झालं आणि तुमच्याबद्दल माहीती मिळणंही बंद झालं. " श्रुती म्हणाली.

"स्वप्नाच्या लग्नानंतर श्रुतीच्या लग्नाचा विचार आमच्या मनात आला. तसे १-२ स्थळं होते पण श्रुतीनच नाही म्हटलं. जेंव्हा तीला आम्ही खोदून खोदून विचारल तेंव्हा आम्हाला तुमच्याबद्दल कळलं. तुमच्याबद्दल ऐकून तीला तुम्ही आवडायला लागले होते" जोगळेकर साहेबांनी पुढची माहीती पुरवली.

"मग तुम्ही सरळ 'प्रपोजल' का नाही पाठवलं? " बाबांनी माझ्या मनातला प्रश्न विचारला.

"विजयरावांना एम. एस्सी. फिजिक्सच झालेली मुलगी हवी होती, त्यामुळे आमचा नाईलाज झाला. "

मी लग्न करेन तर एम. एस्सी. फिजिक्स झालेल्या मुलीशीच करेन हे माझं एम. एस्सी. ला असतांनाच मत होतं. त्यावेळी तशी बरिच विचित्र मतं होती माझी, पण वयानुसार ती बदलत गेली होती. दुर्दैवाने हे स्वप्नाला आणि पर्यायाने श्रुतीला माहिती नव्हतं.

" श्रुतीपुढे एकच पर्याय होता तो म्हणजे तुमचे दोघांचे मन जिंकण्याचा. त्यामुळे ती एम. फील. च्या निमित्याने इथे आली आणि तुमच्यासोबत राहिली. आम्ही तिला ३-४ दिवसच म्हटल होत, पण तुम्ही आग्रहाने तिला १० दिवस ठेवून घेतलं. "

प्रेमापोटी तिने केलेले धाडस कौतुकास्पदच होतं.

"मग नंदु, काय करायचं ?" बाबांनी विचारलं

"मला असं वाटते.... " नंदुभाऊंनी उगाच लांब स्वर लावला, माझ्या हृदयाची धडधड वाढली.

" आपण आधी जेवणं उरकून घेउ... " हे ऐकून मी नि:श्वास सोडला.

मी आणि वहिनींनी भराभर पानं घेतले. मी श्रुतीच्या विरुद्ध बाजुला बसलो होतो. मध्येच तिचं लक्ष नाही असं बघून मी तिच्याकडे पाहिलं. तशी नाकी डोळी निटस असली तरी ती स्मार्ट होती. लॅवेंडर रंगाच्या ड्रेसमध्ये ती छान दिसत होती. लांब मोकळे सोडलेले केस, गहू वर्ण, गोल चेहरा, धनुष्याकृती भुवया, लहान मुलांसारखे गोबरे गाल, चाफेकळी नाक आणि गुलाबी ओठ, ज्यांना लिपस्टिकचा कधी स्पर्शही झाला नसावा.

"व्वा !" माझ्या तोंडून उद्गार निघून गेला तशी श्रुती माझ्याकडे संशयाने बघू लागली.

"भाकरीमुळे मजा आली, नाही का नंदुभाऊ" मी सावरत म्हणालो. तसा वातावरणात आलेला ताण कमी झाला. मग जेवणासोबत गप्पाही सुरू झाल्या.

जेवणानंतर जोगळेकर साहेब आणि बाबा त्यांच्या स्वस्ताईच्या जमान्यात रंगले तर मी बाहेरच्या बगिच्यात बसून श्रुतीला माझ्या मनातले प्रश्न विचारून घेतले. ती ही छान मोकळी बोलली.

आवराआवर झाली आणि पुन्हा बैठक बसली. जोगळेकर साहेब म्हणाले,

"विजयराव, माझ्या मुलीमुळे तुम्हाला जो मनस्ताप झाला त्यासाठी आधी मी तुमची माफी मागतो. "

"नाही नाही... अहो हे काय करत आहे तुम्ही... " मी एकदम अवघडलो.

"काय काका, काय ठरवायचं? " नंदुभाऊंनी मुद्द्याला हात घातला.

"आपण काय बोलणार? पसंती त्याला द्यायची आहे, शेवटी संसार त्याला करायचा आहे. " बाबानी जबाबदारी माझ्यावर ढकलली.

"हो, नंतर त्यानी म्हणू नये की आम्ही बायको गळ्यात बांधली" आईनेही चेंडु माझ्या कोर्टात ढकलला.

"काय विजू, तुझं काय म्हणणं आहे? " वहिनींनी सरळच विचारले.

जसं श्रुतीला माझ्याबद्दल ऐकून ऐकून प्रेम वाटायला लागलं होतं तसच मलाही तिच्याबद्दल 'काहीतरी' वाटू लागलं होतं हे खरं. उगाच का मी रात्री जागून विचार करत होतो ?

आता मला चांगली नोकरीही होती. लग्नाचा विचारही होता, फक्त प्रश्न होता ते माझ्या आईच माझ्या बायकोशी पटेल की नाही. पण आता तोही प्रश्न मिटला होता.

"मला श्रुती पसंत आहे" मी म्हणालो, तशी श्रुती लाजली आणि सगळ्यांना हायसं वाटलं. जोगळेकरांनी डोळे पुसले. तितक्यात मैथिली घरात घुसली.

"श्रुतीताई, श्रुतीताई, माझ्याशी खेळ ना ग "

नंदुभाऊंनी तिला प्रेमाने जवळ घेत म्हटलं, "अबे आता ती श्रुतीताई नाही राहिली काही, ती आता तुझी काकू होणार आहे"

"मग काकू झाल्यावर तु माझ्याशी खेळनार नाही का ? "

तिच्या या निरागस प्रश्नावर सगळेच हसू लागले.

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २००९

प्रयत्न

"तू अशी हार मानून नाही चालणार"
"मला माहिती आहे"
"मग? "
"अग पण प्रयत्न केले नाहीत का मी? "
" मी कुठे म्हणतेय की तू प्रयत्न नाही केलेस. "
"मग मला यश का नाही मिळत? "
"मिळेल रे. तू असा निराश का होतोस? "
"मी इतके प्रयत्न केलेत, अजूनही मला यश मिळालं नाही.... थकलोय मी प्रयत्न करून करून"
"इतक्या लौकर ? "
"तू लौकर म्हणतेस? गेले वर्षभर मी हेच करत होतो ना ? कधीच मी कोणतीही गोष्ट करायला नाही म्हटले नाही. रात्रीचा दिवस केला, अजून काय अपेक्षा आहे तुझी? "
"हं.... मला ठाऊक आहे ते सर्व. "
"तरी तू म्हणतेस इतक्या लौकर? "
"हो... खरंय ते. "
"मला नाही समजलं"
"समज ही एक गोष्ट करण्याच्या १०० पद्धती आहेत. "
"हं... त्यातल्या ९० मी वापरल्या असं म्हणायला हरकत नाही. "
"मग, काय शिकलास त्यावरून? "
"शिकायचं काय. हेच की इतके प्रयत्न करूनही मला अपयशच येतंय. "
"तुला दुसरी बाजू नाही दिसतं? "
"दुसरी बाजू? कोणती? "
"याचा अर्थ आता फक्त १० पद्धती उरल्या ज्याप्रकारे आपण ही गोष्ट साध्य करू शकू. "
"पण........... "
 "आता उरलेल्या १० प्रकारे ही गोष्ट करून बघायची की अपयश हेच फळ असं समजून सगळं विसरून जायचं हा निर्णय तुझा आहे. "
"पण कशावरून १० च प्रयत्नांत साध्य होईल? "
"कदाचित नाही होणार"
"मग"
"पण जितके प्रयत्न तू आतापर्यंत केलेस त्यापेक्षा कमीच करावे लागतील, हे तर मान्य करतोस की नाही? "
"पटतंय तुझं म्हणणं"
"मग आता काय करणार ? "
"पुन्हा नव्याने सुरुवात......... "
"good! that's the spirit! "
"पण कागं, मी इतका निराश झालो असतांना तुला मी यशाच्या अगदी जवळ आहो, असं कसं वाटलं ?
"खरं सांगू? "
"हं"
"जेंव्हा एखादा खूप प्रयत्न करतो, पण यश मिळत नाही आणि ज्यावेळी तो निराश हो़उन प्रयत्न सोडून द्यायचा विचार करतो, त्यावेळी तो यशाच्या सर्वात जवळ असतो. त्यावेळी गरज असते आणखी थोड्या प्रयत्नांची... बस्स..... "
"मान गये यार.... तुझ्यासारखी मैत्रीण आहे, म्हणून.... नाहीतर......... "
"प्रत्येकवेळी मी नसेन......... "
"पण तुझे शब्द माझ्या सोबत राहतील.... नेहमीच.... तुझ्या मैत्रीसारखे........ "

भेट

" मग येतेस का ?"
" कुठे जाणार आहे ?"
" जाउ कुठेतरी"
" आई परवानगी नाही देणार"
" कशावरुन ?"
" ती माझी आई आहे, तिचा स्वभाव माहिती आहे मला."
" अगं, सकाळी जाऊ अन पाच वाजेपर्यंत परत येउ."
" अरे माझी आई नाही परवानगी देणार. तुला नाही माहिती तिचा स्वभाव."
" एक दिवसासाठी सुद्धा नाही."
" उंहू"
" च्च."
" नाराज झालास."
" ........."
" ए बोल ना"
" काय बोलु"
" थोडा माझा विचार कर नं, प्लीज."
" आपली मैत्री हो‍उन एक वर्ष होतयं. पण एकाच शहरात असुन सुद्धा आपण एकदाही भेटलो नाही. तुला कधी भेटावसं वाटत नाही ?"
" वाटतं रे, पण..... माझा नाईलाज आहे"
" हे तुझं नेहमीच आहे."
" .............."
" मी पुढ्च्या महिन्यात नागपुरला जातोय."
" का?"
" माझी बदली झालीय."
" मग परत ?"
" कदाचित कधीच नाही."
" मग आपली भेट केंव्हा होणार ?"
" म्हणुन म्हणतोय, एखाद्या रविवारी भेटूया, सोबत छान लंच घेउ. एकदा तुझ्या आईला विचार तर खरं. का मी विचारु?"
" नाही त्याची गरज नाही. मी येईन."
" तुझी आई परवानगी देईल ?"
" मी सांगेन, मैत्रिणीसोबत जातेय म्हणुन."
"....................."
" आता तरी खुश ?"
".............."
" का ? काय झालं?"
" तुला वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट सांगु."
" तू बदलीची थाप मारलीस ? जाउ दे. मी येईन तुला भेटायला."
" नाही, बदलीतर झालीच आहे. पण तु नको येऊस भेटायला."
" वेडा आहेस की काय तु ? आतापर्यंत मी नाही म्हणत होते, तर आग्रह करत होतास, अन आता येते म्हणतेय, तर नको म्हणतोय...... झालं काय तुला ?"
" आपलं नातं काय आहे."
" अरे काय झालयं तुला ?"
" सांग नं काय नातं आहे आपलं ?"
" मैत्रीचं ! का ? अचानक का विचारतोय ?"
" हे अपवित्र वा घाणेरडं नातं आहे, असं वाटतय का तुला ?"
" ए काहीतरीच काय बोलतोय. मी कधी म्हटलयं का कधी ? पण तुझ्या डोक्यात हे आलचं कसं ?"
" मग तुला खोटं बोलायची गरज काय ?"
" पण आई............."
" जर तुझाच या नात्यावर विश्वास नसेल तर तू तुझ्या आईचा विश्वास बसेल ?"
"..........."
" सॉरी बेबी, पण जर तुला मला भेटायला तुझ्या जन्मदात्या आईशी खोटं बोलावं लागत असेल, तर तू मला नाही भेटलीस तरी चालेल. माझ्या मैत्रीला नाव ठेवलेलं मला पटणार नाही."
" ........... "
" तु विचार कर अन कळव मला. अजुन एक महीना बाकी आहे."
" माझं चुकलं. मी खोटं नाही बोलणार. मी बोलते आईशी. वाटल्यास, तुझ्याशी तिला बोलायला सांगते. चालेल नं ?"
" आता कशी शहाण्यासारखी बोललीस."
" ठेवू मग आता ? मी लगेच आईशी बोलते. "
" ओके, बाय."