खर तर रामदासला देशपांडे सरांना तिसऱ्यांदा डिस्टर्ब करायची अजिबात इच्छा नव्हती. पण त्यांच्या मिसेसने अर्जंट म्हटल्यावर त्याचाही नाइलाज झाला. त्याने भीतभीतच दरवाज्यावर टकटक केली. क्लास चालू असताना देशपांडे सरांना कोणीही डिस्टर्ब केलेल अजिबात आवडत नसे. आता तिसऱ्यांदा कोणीतरी ....... त्यांच्या कपाळावर आठया पडल्या. नाराजीनेच त्यांनी दरवाजा उघडला. रामदासला पाहुन ते भडकलेच.
"तुला दुसरी काम नाहीत का? आता काय आहे?"
सर, मॅडमचा फोन आहे."
"सांग तिला नंतर कर म्हणून...." ते दरवाजा लोटत म्हणाले.
"सर त्यांना काहीतरी अर्जंट बोलायचे आहे."
"हं........... ठिक आहे" निराश होउन त्यांनी वर्ग सोडला. विद्यार्थ्यांच्याही चेहऱ्यावर निराशा झळकत होती.
"ही रुची म्हणजे नं...." चरफडतच ते ऑफिसमधे आले अन फोन उचलला.
"हॅलो, मी रमेश, काय झालं?"
"अहो.... मी...." पलिकडून एक रडका आवाज आला.
"रुची, काय झालं? अगं सांगशील तर...." देशपांडे सरांनी थोडं समजुतदारपणे विचारलं.
"रमेश, अहो मी इकडे बायपासला आहे....." रुचीच्या आवाजातला रडकेपणा कमी झाला होता.
"बायपासला? तिकडे काय करतेय?" रमेशचा राग अद्याप गेला नव्हता.
"अहो मी प्रॅक्टीससाठी इकडे जुन्या बायपासला आली होती." ती कशीबशी बोलली.
घाबरटपणा आणि आत्मविश्वासाचा अभाव या दोन गोष्टी सोडल्या तर रुची एक उत्कृष्ट पत्नी होती. लग्नाला आठ वर्ष झालीत पण तीनं रमेशशी भांडण तर सोडाच, त्याची साधी तक्रारही कोणाकडे केली नव्हती. अर्थात रमेशही तीला जीवापाड जपायचा. तसा तो मुळचाच श्रीमंत आणि आता प्राध्यापक. मोठ्या हौसेने त्याने तिच्या वाढदिवसाला तीला फोर व्हीलर भेट दिली. गाडीचा नंबर खास निवडुन आणला होता. एम. एच. १४ आर १०७५, ते तिची जन्मतारीख १४.१०.७५ यावरुन. मात्र रुचीला वर्षभर जमेल तशी प्रॅक्टिस करुनही गाडी चालवण्याचा आत्मविश्वास काही येत नव्हता. गर्दीत किंवा शहरात तर सोडाच, मोकळ्या रस्त्यावरही तीला थोडी भितीच वाटायची. त्यामुळे ती कधी, कुठे, कशी गाडी फसवेल काही सांगता येत नव्हतं. आणि अर्थातच असा काही प्रॉब्लेम आला की ती लगेच रमेशला कॉल करुन बोलवायची.
आजही तेच. खरं तर रमेशने आज त्याचा आवडता टॉपिक सुरू केला होता. मुद्दाम सकाळचे दोन लेक्चर्स सलग घ्यायचे ठरवलं होतं, पण........
नुकताच, काही दिवसांपुर्वी शहराबाहेरुन जाणारा नविन बायपास झाला होता म्हणून रमेशनेच तीला जुन्या बायपासला प्रॅक्टिस करायचा सल्ला दिला होता. तिथेच काहीतरी गडबड झाली असणार हे त्याच्या लक्षात आलं. स्वतःला कंट्रोल करत तो म्हणाला,
"रुची...... काय झालं? तू जरा मला व्यवस्थित सांगते का?"
"अहो, मला काही सुचतच नाही हो" ती अधिकच रडवेली झाली.
"रुची प्लीज, .... जस्ट रिलॅक्स...... आणि रडू नकोस.., प्लीज" एव्हाना ऑफिसमधले सगळे लोक आपापल्या कामाला लागले होते. त्यांच्यासाठी हे नेहमीचच होतं.
"काय झालं? तू दुसऱ्या गाडीला धडक मारली?"
"न नाही.."
"गाडी चिखलात फसलीय?"
"नाही..."
"मग? ट्रॅफिक पोलिसने अडवली?"
"नाही...."
"अगं मग झालं तरी काय?" रमेशने थोडसं वैतागुन विचारलं.
"अहो, गाडीसमोर एक माणुस........" ती कशीबशी बोलली.
"व्हॉट? तू त्या माणसाला उडवलस ?" तो जवळजवळ ओरडला, तसे ऑफिसमधले लोक त्याच्याकडे बघु लागले.
"अहो नाही......... मी नाही" तीला रडू आवरेनासं झालं.
"तू नाही उडवलस तर तो माणुस काय स्वतःच तुझ्या गाडीवर येउन पडला की काय?" रमेश तिच्या रडण्याने वैतागला होता.
"हो......." ती फोनवरच हमसाहमशी रडू लागली.
"रुची, तू रडणं बंद करते की मी फोन ठेवू?" तो चिडुन ओरडला. ती मात्रा लगेच लागू पडली. रुचीने रडणे बंद केले.
"आता सांग काय झालं?"
"अहो, मी ३० च्याच स्पीडने जात होते. सन्मती कॉलनीच्या चौकाजवळ एक माणुस समोरुन धावत आला. मी ब्रेक मारला, गाडी थांबवली, तसा तो गाडीवर येऊन पडला. त्याला खुप लागलयं वाटते. त्याच्या मागे तीन चार लोक तलवारी घेउन येत होते. तो गाडीवर येउन पडला तसे ते पळून गेले."
"तो जिवंत आहे का?" रमेशने काळजीने विचारले.
"माहीती नाही"
"अगं मग बघ ना..........." तो पुन्हा ओरडला.
तिकडून दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि पाठोपाठ स्स असा उद्गारही ऎकला.
"अहो..."
"हं, काय झालं?"
"तो रक्ताने माखलाय."
"पण तो जिवंत आहे का?"
"बहुतेक......."
रमेशला शेजारच्या भिंतीवर डोकं आपटून घ्यावसं वाटलं. इतकी घाबरट बायको आपल्याच नशिबी असल्याबद्दल त्याने स्वतःच्याच नशिबाला शिव्या घातल्या. पण तो लगेच सावरला. त्या माणसाच्या जीवन-मरणाचा प्रश्न होता, अर्थात तो जिवंत असेल तर.........
"रुची, मी काय सांगतो ते व्यवस्थित ऎक."
"हं"
"त्याला उचल आणि गाडीत टाक."
"मी?"
"हो... शेजारी कोणी असेल तर त्याची मदत घे........"
"इथे कोणीच नाही."
"रुची, हा एका माणसाच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे"
"पण मी त्याला कसं उचलू? त्याचं रक्त...."
"जस्ट फर्गेट एव्हरीथिंग... विचार कर, तो माणुस मी आहे, मी, तुझा नवरा......"
"रमेश........" ती जवळजवळ ओरडलीच.
"जवळच संजीवन हॉस्पिटल आहे, तिथे त्याला घेउन जा. मी येतोच."
"पण ........."
"लक्षात ठेव रुची, त्याला काही झालं नं तर मी जन्मभर तुझ्याशी बोलणार नाही" रमेशने रागातच फोन आपटला. तो अगदी सुन्न झाला होता.
"सर .......... जायच का?" रामदासने विचारले.
रुची त्या माणसाला हॉस्पिटलला व्यवस्थित पोहचवेल की नाही याची त्याला शंकाच होती. एक तर तिला गाडी चालवायची भिती वाटायची, त्यात रक्ताने माखलेला माणुस म्हणजे........
"सर......" रामदासने पुन्हा एकदा हाक मारली.
"अं........" तो तंद्रीतुन जागा झाला.
"चलायचं.........?" रमेशला त्यावेळी रामदासचं कौतुक वाटलं. लगेच ते दोघही हॉस्पिटलला निघाले. रमेशने त्याला मुद्दाम जुन्या बायपासवरुन घ्यायला सांगितलं. सन्मती कॉलनीच्या चौकाजवळ थोडसं रक्त सांडलेलं दिसलं, पण १४१०७५ दिसली नाही तसा तो थोडा निर्धास्त झाला. याचा अर्थ रुचीनं त्याला हॉस्पिटलला नेलं होतं.
पुढच्या १० मिनिटात ते दोघ हॉस्पिटलला आले. सकाळची वेळ असल्यामुळे पार्किंग प्लेस अगदीच मोकळी होती. पण तिथे त्याला त्याची गाडी दिसली नाही. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ’रुची गेली कुठे’ हा विचार करतच तो रिसेप्शनला आला.
"आत्ता इथे एका माणसाला अडमिट केलय का?"
"नाव काय?" रिसेप्शनिस्टने थंड चेहऱ्याने विचारले.
"नाही, मला नाव माहीती नाही, पण पंधरा-वीस मिनिटांपुर्वी ..........."रमेशने निराशेने विचारले.
"हे बघा इथे रोजच कोणीना कोणी अडमिट होतं. नाव सांगीतल्याशिवाय कसं कळणार?"
रुची तिथेच आली होती याची त्याला खात्री नव्हती, तरी शेवटचा प्रयत्न म्हणुन तो म्हणाला,
"त्याच्या शरीरावर तलवारीचे घाव..........."
"तो का?" मध्येच एका नर्सने तोंड खुपसले.
"हं ... तो कुठाय?"
रमेश त्या नर्सने दाखवलेल्या दिशेकडे धावतच सुटला. शेवटच्या खोलीजवळ रुची उभी होती. तिची पिवळी साडी रक्ताने लाल झाली होती. शेजारच्या बाकड्यावर एक हवालदार तंबाखू मळत बसला होता.
"तो कुठाय?" रमेशने उत्सुकतेने विचारलं
"..........." ती एकदम रडू लागली.
"म्हणजे तू ..... तू ..... त्याला........"
"नाही हो........"
"मग कुठाय तो?"
"ऑपरेशन थिएटर..." ती कशीबशी म्हणाली.
"हं....... पण मग गाडी कुठे आहे?" त्याने संशयाने विचारलं.
तीने शेजारच्या खिडकीतुन गाडीची अवस्था दाखवली. समोरचा भाग कोपऱ्यावर धडकला होता, पण फारस नुकसान झालं नव्हतं.
"घाईघाईत ब्रेक लागलाच नाही....." तीचं रडणं चालुच होतं.
"हं" तो निश्वास टाकत म्हणाला. पण तिचं मुसमुसणं चालुच होतं.
"अगं पण तू आता का रडते आहेस?"
".................."
"गाडीचं नुकसान झालं, म्हणुन?"
तीने मानेनेच नकार दिला.
"मी मघाशी फोनवर रागावलं, म्हणुन?
"नाही"
"तुला रक्ताची भिती वाटली का?"
"नाही"
"नविन साडी खराब झाली म्हणुन ?"
"नाही."
"अगं मग झालं तरी काय?"
"आता तरी तुम्ही माझ्याशी अबोला धरणार नाही ना?" तीने मुसमुसतच विचारलं. रमेशला एकदम गलबलुन आलं. त्याने तिचा चेहरा ओंजळीत धरला, तिच्या गालावरचे अश्रु पुसले अन म्हणाला,
"ए रुची, वेडी कुठली. अगं मी तुझ्यावर रागवेन का? अं ? खर सांगू ?"
"हं"
"आज मला तुझा अभिमान वाटतोय. आय अम प्राउड ऑफ यू."
"खरचं? तीने थोड्या आश्चर्यानेच विचारले.
"अगदी खरं. तुझी शप्पथ!" असं म्हणत रमेशने तिला छातीशी धरले. रामदासने मात्र तेथुन काढता पाय घेतला.
२ टिप्पण्या:
जबरदस्स्त !!
धन्यवाद शार्दुल
टिप्पणी पोस्ट करा