गुरुवार, २४ जून, २०१०

सोनल

लग्नानंतर बायकोशी नेमकं कोणत्या विषयावर बोलावं हे माझ्यासारख्या मुलींशी फटकून राहणाऱ्याला काय कळणार? मी उगाच तिच्याशी काहीतरी बोलायचं म्हणून बोलत होतो (खरं तर ऐकत होतो). आम्ही आमच्या रूमसमोरच्या मोकळ्या जागेत गप्पा मारत होतो. उन्हाळा असल्याने लाइट नव्हते, मग करणार तरी काय? त्यात ते ब्रेली, म्हणजे लाइट कधी येईल माहिती नाही.
अचानक तिने प्रश्न केला.
"तुम्ही मुंबईत असताना काय करत होतात? "
"म्हणजे ? " मला प्रश्नाचा रोख कळला नव्हता.
"म्हणजे शनिवारी, रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी... "
"अच्छा ! ते होय. हम्म... मी बरेचदा सोनलकडे जायचो. म्हणजे महिन्यातून दोनदातरी चक्कर व्हायची. नेरुळपासून १० मिनिटांवर सोनलचा फ्लॅट होता. मग आम्ही मिळून स्वयंपाक करायचो किंवा बाहेरच जेवायला जायचो. "
"सोनलची अन तुमची चांगलीच मैत्री आहे, नाही ? "
"मग काय ! अगदी लहानपणापासून. ४थी पर्यंत एकाच शाळेत होतो, नंतर वेगळ्या शाळा झाल्यातरी मैत्री कमी नाही झाली. "
"वॉव ! तुम्ही नाटकाला वगैरे जात होते? "
"हो, वाशीला एक नवीन नाट्यगृह सुरू झालं होतं. तिथं आम्ही "राशीरंजन" बघितलं होतं. पण मरीन ड्राइव्ह फिरण्याची वेगळीच मजा राहायची. सोनल म्हणजे मुंबईत एक्स्पर्ट... दादरपासून सिएसटी/चर्चगेटपर्यंत बऱ्याच गोष्टी माहिती. मला काहीही खरेदी करायची असली की मी लगेच सोनलला फोन करून विचारायचो.
"तुम्ही त्यांच्या फ्लॅटवर गेल्यावर काय-काय करायचे ? "
"अं ... बरेचदा जवळच फिरायला जाणे, किंवा नाटक, वगैरे... आणि रात्री इंडियन आयडॉल... मी पहिल्यांदा इंडियन आयडॉल सोनलकडेच बघितलं"
"हो? "
"हो नं.... पण तोच त्याचा शेवटचा एपिसोड होता".
"मग ? "
"मग एच.बी.ओ. किंवा स्टार मुव्हिजचे पिक्चर्स... "
"इंग्रजी? "
"हो. मग काय ! आम्हाला दोघांनाही खूप आवडतात इंग्रजी पिक्चर्स... रात्री उशीरापर्यंत पिक्चर्स बघायचो... काय मस्त दिवस होते ते... "
"त्यांचा फ्लॅट किती मोठा आहे ? "
"अं. .. २ बेडरूम आणि हॉल किचन... मस्त फ्लॅट आहे.... "
"मग तुम्ही बेडरूममध्येच झोपत होते ? "
"नाही गं.... हॉलमध्येच .. "
"दोघही ? "
"हो, .... " मला कळेचना हि असं काय विचारतेय. बरं अंधारात तिच्या चेहऱ्यावरचे हावभावही कळत नव्हते... मला वाटलं की ती माझी मजा घेतेय.
"जा ... तुम्ही मला फसवलं" मला मुसमुसण्याचा आवाज आला.
"म्हणजे ........ ? " मी चक्रावलो होतो.
"तुम्ही दर शनिवारी सोनलच्या फ्लॅटवर जात होते... एकत्र जेवण, नाटक, इंग्रजी सिनेमे, अन मग .... " आत्ता माझी ट्यूब पेटली.
"ए बाई, अगं सोनल माझा मित्र आहे... "
"काय ? आता काही सांगू नका .... सोनल नावाची मैत्रिण आहे तुमची .. आणि ... "
"आता कसं समजावू तुला ? "
"इतकंच असेल तर फोन लावून द्या मला ... "
"मला त्याचा नवीन नंबर माहिती नाही. "
"काही नाही हि सगळी नाटकं आहेत"
"तुला विश्वास नसेल तर माझ्या आईला विचार. सोनलचं घर अन माझं घर अगदी जवळ आहे, ती सांगेल तुला. "
"काही नको.... " मग मोठ्यानं रडणं....
********************************************
२-३ दिवस असेच गेले. मी सुद्धा काय करावं या विचारात होते... मग एक दिवस संध्याकाळी ती म्हणाली,
"खरंच सोनल तुमच्या मित्राचं नाव आहे ? "
"अग हो, खरंच.. "
"सॉरी बरं, कारण सोनल माझ्या एका मैत्रिणीच नाव आहे .. त्यामुळे मी ... "
मी डोक्यावर हात मारून घेतला.
****************************************************************
आजही कधी सोनलचा विषय निघाला की मी मोठ्याने हसतो, तर ती धमकी देते, "मला एकदा बघितल्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाही की सोनल तुमच्या मित्र आहे, मैत्रीण नाही".
अर्थातच हि गोष्ट सोनलला माहिती नाही, नाहीतर .......

बुधवार, ९ जून, २०१०

भ्रमिष्टपणा

म्हातारपणा तसा वाईटच. त्यात भ्रमिष्टपणा आला तर अधिकच वाईट. पण कधीकधी अश्या गोष्टी मजेदार वाटू लागतात, अर्थात, जोपर्यंत आपण स्वतः त्या व्यक्तीच्या संपर्कात नसतो, तोपर्यंतच.

मी अमरावतीला असताना माझ्या खोलीजवळच्या एका आजोबांची गोष्ट. पहिल्यांदा त्यांना भेटलो तेव्हा मला फारच विचित्र वाटलं होतं. मी कॉलेजच्या गडबडीत होतो, अन त्यांनी बोलावलं.

"ये बाळ"

"मी २५ चा बाळ ? " मी मनात. असो.

"तुझ्या बाबाला ओळखतो मी". बाबा बरेच वर्ष अमरावतीला होते, तेव्हा हे शक्य होतं. मला आनंद झाला.

"हो ? कसं काय? "

"ते जाऊ दे पण त्याच्याकडून मी एकदा २ आणे उधार घेतले होते. ते त्याला देशील? "

"अहो पण आजोबा २ आण्याचं काय. "

"नाही, हिशोब म्हणजे हिशोब, घे... " असं म्हणत त्यांनी मला चार आणे दिले.

१~२ दिवसातच जेव्हा "भ्रमिष्टपणा कळला तेव्हा वाईट वाटलं. ते कोणीही रस्त्यावरून जाणारा असला की त्याला बोलावून २५ पैसे द्यायचे

मला दर ३-४ दिवसाआड ते बोलवायचे, अन कधी रिक्षावाला, तर कधी धोबी, कधी भाजीवाला... असं म्हणत चार आणे द्यायचे. पण मी संध्याकाळी जाऊन ते पैसे घेऊन यायचो आणि त्यांच्याच नातीला कधी बिस्किट, गोळ्या घेऊन द्यायचो. मग काय ? अहो हिशोब म्हणजे हिशोब.

दुसरा किस्सा माझ्या दूरच आजीचा.

त्या आजीला भेटलो ते तिच्या नातीच्या लग्नात. लग्नानंतर नात आणि जावई आलेले होते. सगळे जेवायला बसले, तशी आजीही बसली. ५ मिनिट झाले, अन आजी काहीतरी पुटपुटली. माझ्या आईने त्यांना भाजी वाढली, तर एकदम घाबरली आणि म्हणाली, " अई बाई, आता काय करू मी. हिनं मला दुसऱ्यांदा भाजी वाढली. आता कसं करू ? मी तर एकदाच भाजी खात असते. आता भाजी वाया जाईल. " पुढचे १५ मिनिट आजीचं तेच चालू होतं. आई अगदी घाबरून गेली, पण आजीच्या सुनेने समजावलं की त्या अश्याच करतात. अगदी पहिल्यांदा भाजी वाढली तरी सुद्धा. त्यांना विसर पडतो की आपण काही खाल्लेलं नाही.

तिसरे एक आजोबा, कोणीही त्यांच्या घरी आला, की सुनेवर ओरडायचे, " सूनबाई, मला भूक लागली गं. मला जेवायला दे गं बाई". समोरच्या व्यक्तीला वाटावं की सून सासऱ्याला छळते. पण ते आजोबा आपण जेवलो हेच विसरून जायचे. मग सून त्यांना दिवसातून ७~८ वेळा जेवू घालायची. आणि पहिल्यांदाच वाढताना विचारायची, " अजून पोळी वाढू का? "

लोकांनी माझे असेच किस्से सांगू नये, हिच देवाचरणी प्रार्थना