बुधवार, ९ जून, २०१०

भ्रमिष्टपणा

म्हातारपणा तसा वाईटच. त्यात भ्रमिष्टपणा आला तर अधिकच वाईट. पण कधीकधी अश्या गोष्टी मजेदार वाटू लागतात, अर्थात, जोपर्यंत आपण स्वतः त्या व्यक्तीच्या संपर्कात नसतो, तोपर्यंतच.

मी अमरावतीला असताना माझ्या खोलीजवळच्या एका आजोबांची गोष्ट. पहिल्यांदा त्यांना भेटलो तेव्हा मला फारच विचित्र वाटलं होतं. मी कॉलेजच्या गडबडीत होतो, अन त्यांनी बोलावलं.

"ये बाळ"

"मी २५ चा बाळ ? " मी मनात. असो.

"तुझ्या बाबाला ओळखतो मी". बाबा बरेच वर्ष अमरावतीला होते, तेव्हा हे शक्य होतं. मला आनंद झाला.

"हो ? कसं काय? "

"ते जाऊ दे पण त्याच्याकडून मी एकदा २ आणे उधार घेतले होते. ते त्याला देशील? "

"अहो पण आजोबा २ आण्याचं काय. "

"नाही, हिशोब म्हणजे हिशोब, घे... " असं म्हणत त्यांनी मला चार आणे दिले.

१~२ दिवसातच जेव्हा "भ्रमिष्टपणा कळला तेव्हा वाईट वाटलं. ते कोणीही रस्त्यावरून जाणारा असला की त्याला बोलावून २५ पैसे द्यायचे

मला दर ३-४ दिवसाआड ते बोलवायचे, अन कधी रिक्षावाला, तर कधी धोबी, कधी भाजीवाला... असं म्हणत चार आणे द्यायचे. पण मी संध्याकाळी जाऊन ते पैसे घेऊन यायचो आणि त्यांच्याच नातीला कधी बिस्किट, गोळ्या घेऊन द्यायचो. मग काय ? अहो हिशोब म्हणजे हिशोब.

दुसरा किस्सा माझ्या दूरच आजीचा.

त्या आजीला भेटलो ते तिच्या नातीच्या लग्नात. लग्नानंतर नात आणि जावई आलेले होते. सगळे जेवायला बसले, तशी आजीही बसली. ५ मिनिट झाले, अन आजी काहीतरी पुटपुटली. माझ्या आईने त्यांना भाजी वाढली, तर एकदम घाबरली आणि म्हणाली, " अई बाई, आता काय करू मी. हिनं मला दुसऱ्यांदा भाजी वाढली. आता कसं करू ? मी तर एकदाच भाजी खात असते. आता भाजी वाया जाईल. " पुढचे १५ मिनिट आजीचं तेच चालू होतं. आई अगदी घाबरून गेली, पण आजीच्या सुनेने समजावलं की त्या अश्याच करतात. अगदी पहिल्यांदा भाजी वाढली तरी सुद्धा. त्यांना विसर पडतो की आपण काही खाल्लेलं नाही.

तिसरे एक आजोबा, कोणीही त्यांच्या घरी आला, की सुनेवर ओरडायचे, " सूनबाई, मला भूक लागली गं. मला जेवायला दे गं बाई". समोरच्या व्यक्तीला वाटावं की सून सासऱ्याला छळते. पण ते आजोबा आपण जेवलो हेच विसरून जायचे. मग सून त्यांना दिवसातून ७~८ वेळा जेवू घालायची. आणि पहिल्यांदाच वाढताना विचारायची, " अजून पोळी वाढू का? "

लोकांनी माझे असेच किस्से सांगू नये, हिच देवाचरणी प्रार्थना

1 टिप्पणी:

भानस म्हणाले...

खरेच, अशी वेळ कोणावरच येऊ नये. :(