बुधवार, २ मार्च, २०१६

ज्योतिषी

खरं तर श्री मामासोबत जायला नाखुश होता. एकतर जोतिष्याची प्रचंड चीड अन मामाच्या अखंड बोलण्याचीही. त्याचा मामाही एक छोटासा जोतिषी. पण त्याच्यावर विश्वास नाही, म्हणुन आज खास मामाने प्रख्यात जोतिषी महादेव शास्त्रींची भेट घ्यायची ठरवले होते. महादेव शास्त्री, थोडेसे तापट स्वभावाचे होते, त्यामुळे लोकं त्यांच्यापुढे जरा बिचकुन असायचे. त्यामुळे त्यांच्या घरी श्री काही बोलणार नाही हे पढवुनच मामा त्याला घेउन आला होता.
मामा-भाचे पोहचले, तेंव्हा सकाळचे १० वाजले होते, पण अंगातुन घामाच्या धारा वाहत होत्या. शास्त्रींच्या बंगल्यात शिरले, तर थंडगार एसीने त्यांना बरं वाटलं. हॉलमध्ये महादेव शास्त्रींचा एक सहाफुटी फोटो होता. त्याला मामाने वाकुन नमस्कार केला. श्रीलाही नमस्कार कर म्हटले, तर श्री चिडला.
"इथे आलो तेच खूप समज... नाहीतर तुमच्यासारखे भोंदू..."
"ए... चुप बस आता... "
मामा पुढे काही बोलणार, इतक्यात शास्त्रीजी येण्याची त्याला चाहुल लागली.
"हरी ओम... हरी ओम..."
"गुरुजी नमस्कार करतो."
"आयुष्यमान भव..."
"गुरुजी, हा माझा.........."
"फक्त जन्मवेळ, स्थळ आणि तारिख"
मामाने चुपचाप माहिती दिली.
महादेव शास्त्रींनी लगेच टॅबवर आकडेमोड केली आणि पत्रिका बनवली. ते बघुन श्रीला थोडेसे हसु आले. पण बराच वेळ ते पत्रिकाच बघत बसले. ते काही बोलत नाही, असं बघुन मामाने थोडीशी चुळबुळ केली, पण शास्त्रींनी त्यांना काही बोलू नका, असे खुणावले.
श्रीला त्यांचे पत्रिका अध्ययन म्हणजे एक बकध्यान वाटले. शास्त्रींऐवजी एक बगळा आपली पत्रिका बघतोय, असं चित्र डोक्यात येउन त्याला पुन्हा हसू येऊ लागले.
"हम्म..... अशी पत्रिका बघणे, फार कमी लोकांच्या नशिबात असते..."
"म्हणजे गुरुजी.........." मामाला जरा आनंद झाला.
"म्हणजे तू जोतिष्याचा अभ्यासक अन हा.... निंदक..."
"पण............."
"पण नाही अन बिण नाही........ इथुन तडक निघायचं.... हा विश्वास ठेवणार नाही, पण याची पत्रिकाच दाखवते की हा जन्मभर जोतिष्याच्या विरोधातच बोलणार आणि तसं कार्यही करणार.........."
"गुरुजी, ............"
"निघा.........." शास्त्रींनी कडक शब्दात म्हटले.
श्री लगेच उभा राहिला, पण मामा मात्र अस्वस्थपणे बसुन राहिले.
"निघा म्हटलं मी............ काय?" पुन्हा एकदा शास्त्रींनी आवाज चढवला.
मामांनी पुन्हा एकदा नमस्कार केला, अन पडलेल्या चेहर्‍याने बाहेर निघाले. श्रीला बाहेर येताच मामाचा चेहरा बघुन हसू आवरेनासे झाले. त्याला हसताना बघुन मामा अधिकच चिडला.
बराच वेळ गेला, एस्टीत थंड हवा लागली तसं मामाचं डोकं शांत झालं. तो जरा विचार करु लागला. गाव आलं, तशी दोघही उतरली. अन अचानक मामा म्हणाला,
"तुझा खरच जोतिष्यावर विश्वास नाही ना?"
"अर्थातच !"
"मग ह्या पत्रिकेवरुन शास्त्रीजींनी सांगीतलेले भविष्य खोटे ठरवुन दाखव.........."
नेहमी तर्काने विचार करणारा श्री मात्र त्यातील मेख समजुन निरुत्तर झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: