बुधवार, १८ ऑगस्ट, २०१०

प्रेमाचा गुलकंद

बसनं इंदौर सोडलं आणि माझी झोप उडाली. ३० सीटर बसमध्ये २७ नंबरच्या सीटवर बसलेल्या आणि म. प्र. मधील रस्त्यांवर चालणाऱ्या बसमध्ये माणसाची हालत व्हॉलीबॉलसारखीच होते. मी अमरावती विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या नावाने शिव्या घालत, हा व्हॉलिबॉलचा खेळ कधी संपतो, याची वाट पाहत होतो. शरीराने जरी मी बसमध्ये असलो तरी मनाने कधीचाच अमरावतीला पोहचलो होतो.

खरं तर मला एका आठवड्यात 'मायग्रेशन सर्टिफिकेट' द्यायचे होते, म्हणून मी अमरावतीचा बेत आखला होता, पण त्यासोबतच श्रद्धाचं लग्नही अटेंड करायचं होतं. श्रद्धा माझ्या आवडत्या ज्युनिअरपैकी एक होती. खरं तर ती कोणालाही आवडेल अशीच होती. कॉलेजची ब्युटीक्वीन न आवडणारा एखादा आंधळाच असता.

माझ्या डोळ्यासमोरून ती २ वर्ष सरकत होती. श्रद्धाचा अन माझा पहिला परिचय झाला तो 'परिचय कार्यक्रमात'. खरं तर ती एक प्रकारची रॅगिंगच होती, मेंदूची.

"नाव ?"

"श्रद्धा" ती घाबरत हळू आवाजात म्हणाली.

"चढ्ढा ? " मी उगाचच चिडवलं.

"नाही .. श्रद्धा" ती पुन्हा म्हणाली.

तिच्या आधी जवळजवळ सगळ्याच मुलींना त्रास देऊन झालं होतं, त्यामुळे कदाचित तिने राग मानला नसावा. कारण तसं तिच्या चेहऱ्यावर दिसलं नव्हतं.

"हॉबी काय आहे तुमची ? "

आतापर्यंत ज्याने जी हॉबी सांगितली त्यात मी आणि मनोजने समोरच्याला प्रश्न विचारून पार हैराण केले होते. आणि आताही आम्ही संधी सोडणार नव्हतो.

"स्वयंपाक करणे" ती शांतपणे म्हणाली, तसं तिला राग का आला नव्हता, ते कळलं.

" तू विचार " मनोजने माझ्याकडे चेंडू टोलवला.

आता आम्हाला स्वयंपाकाबाबत तो कसाही असलातरी चापून खाणे आणि मेसवाल्याला दिलेले पैसे वसूल करणे, इतकंच माहिती होतं. आम्ही कधीही भाजी कसली आहे, अन त्यात काय टाकायला हवं होतं याही भानगडीत पडलो नव्हतो. पण माझ्याकडे आलेला चेंडू मुलींकडे सोपवणे म्हणजे घोर अपमान वगैरे वाटला, म्हणून सहज विचारलं,

"काय करता येते स्वयंपाकात? "

"शाकाहारी जवळजवळ सगळेच पदार्थ" हे ऐकून आमच्याच वर्गमैत्रिणी गालातल्या गालातल्या हसत असल्याचे मनोजच्या लक्षात आले अन ते त्यानं मला हळूच खुणावून दाखवलं.

"अच्छा... अशी खुन्नस काढत आहे का ?" मी मनाशीच म्हणालो. श्रद्धाही गालातल्या गालात हसत होती. माझं डोकंच फिरलं, पण कंट्रोल करत मी विचारलं,

"पुरणपोळी करता येते? "

"हो" ती इतकी सहजतेने म्हणाली की माझा आत्मविश्वास डळमळायला लागला. पालक म्हणून आंबटचुका आणणारा मी, कोहळ्याला रंगीत भोपळा म्हणून विकत घेणारा मी आणि असे अनेक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर दिसायला लागले. पण म्हणतात ना की माणूस घाबरला की रागावतो, अन तसंच झालं.

"कोणत्या डाळीचं करतात पुरण? "

"हरबऱ्याच्या" काय मूर्खासारखं विचारत आहे, असा भाव चेहऱ्यावर आणत ती म्हणाली. मी अजूनच इरेला पेटलो. उत्तरातून नवीन प्रश्न तयार करण्यात माझा हातखंडा होता, त्यानुसार मी विचारलं,

"का ? तुरीच्या डाळीचं नाही करता येत ? "

एखाद्याला एखादी गोष्ट करता येणे आणि त्याला असच का करायचं हे माहिती असणे यांत फरक असतो. ती विज्ञानाची विद्यार्थिनी होती गृहविज्ञानाची नाही. त्यामुळे तिची थोडी चलबिचल झाली.

"नाही म्हणजे करता येते पण .. "

"मग का नाही करत?" मी डाव परत हातात आल्याच्या आनंदात विचारलं.

"मला नक्की नाही माहिती पण मी उद्या सांगेन" तिचा आत्मविश्वास कमी पडला असावा.

"अहो तुमची हॉबी आहे ना ? मग कमीतकमी इतकं तरी माहिती पाहिजेच ना ? " मी उगाचच चिडवलं.

"तुम्ही दुसरं काही विचारा सर.. " ती जरा खिन्न होऊन म्हणाली.

"असं. बरं हे सांगा की चण्याच्या डाळीचं पुरण करता येते" मी पुन्हा मूळपदावर आलो.

"सर पुरण सोडून दुसरं काही ... "

"नाही ... उद्या तुम्ही विचारून या, मग बघू ..." असं म्हणत मी माझ्या वर्गमैत्रिणींकडे खुन्नसने बघितलं. त्यांचा चेहरा पडला होता.

********************************************************************

दुसऱ्या दिवशी ती तयारी करून आली असावी, कारण मी "पुरण" म्हणताच तिने सुरुवात केली.

"सर हरबरा आणि चणा डाळ एकच आहे"

"नक्की ?"

"हो सर मी आईला विचारून आलीय... आणि तुरीच्या डाळीचही करतात पण चव थोडी वेगळी असते ... "ती म्हणाली.

"मग काय शिकल्या तुम्ही यातून ?" मी उगाच फिलॉसॉफी झाडली.

"सर मी शिकली की माणसाला आत्मविश्वास असावा तर तुमच्यासारखा" हे ऐकून मी स्वतःच चकीत झालो तर वर्गमैत्रिणी जळून खाक.

आदल्या दिवशी विद्यापीठापासून दस्तुरनगर हे ८-१० किमी अंतर सायकलने जाऊन ताईकडून "चणा आणि हरबरा डाळीत काय फरक असतो हे समजून घेतलं होतं", याचं समाधान वाटलं होतं आणि आनंदही.

अश्याच काही प्रसंगांची उजळणी होत होती, पण मध्येच बसणाऱ्या धक्क्यांनी त्या धुंदीतून बाहेर येत होतो आणि पुन्हा त्या आठवणींत हरवून जात होतो.

आमचं इंट्रो (इंट्रोडक्शन) चांगलं चालू होतं. मी आणि मनोजच फक्त प्रश्न विचारत असल्यामुळे आम्ही दोघं सगळ्या ज्युनिअर्सच्या ओळखीचे झाले होतो. पण आमची कीर्ती इतकी पसरली असेल असं वाटलं नव्हतं. रोज कॉलेज ४:३० ला सुटायचं आणि आम्ही अर्धा तास ज्युनिअर्सला तासायचो. साधारण १५-२० झाले होते. आता आम्हालाही अभ्यासाला लागणे भाग होते, शेवटी थोडक्यात मजा असते. नेमकं ज्या दिवशी आम्ही हे रॅगिंग संपवणार होतो, त्याच दिवशी श्रद्धाचा भाऊ आला अन ती वर्गात न दिसल्याने सरळ आमच्या एच. ओ. डी. कडे गेला. एचओडी काही सांगणार त्याआधीच तो भडकला, अन झालं.

त्याच्या अपेक्षेनुसार एचओडी गयावया करतील असे वाटले पण झाले उलटेच. एचओडिने त्यालाच झापले, अन म्हणाले की पाहिजे असेल तर त्याच्या बहिणीची ऍडमिशन कॅन्सल कर. तो घरी जाऊन श्रद्धाला बोलला असावा. दुसऱ्या दिवशी एचओडीने आमची बाजू घेऊन सगळ्या ज्युनिअर्सला इतकं खडसावलं की बस्स... सगळे ज्युनिअर्स घाबरले.

त्या दिवशी आम्ही "इंट्रो" नाही म्हणून मी मनोजसोबत निघालोच होतो की श्रद्धा समोर आली. ती म्हणाली,

"सर, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं"

"हा, बोला ना" मला वाटलं की नोटस वगैरे मागेल. पण तिच्या डोळ्यात एकदम पाणी आलं. ती काही बोलणार इतक्यात फकडी आला. फकडी म्हणजे एचओडीचा प्युन. जसं वादळ यायच्या आधी फकड्या येतात तसा हा नेहमी एचोडीच्या क्लासच्या आधी यायचा म्हणून त्याचं नाव फकडी ठेवलं होतं.

"सरांनी बोलवलंय"

"मला ? " मी आश्चर्याने विचारलं कारण 'फी बाकी आहे' या एकाच कारणासाठी एचओडी बोलवायचे, पण माझीतर फी भरून झाली होती.

"दोघांनाही"

आम्ही एचओडीकडे गेलो. एचओडीने आम्हाला बसवले. आम्ही सर्द. आदल्या दिवशीचा श्रद्धाच्या भावाचा आणि नंतर त्यांनी ज्युनिअर्सला खडसावल्याचे सांगितले. मग म्हणाले,

"चांगलं तासून घ्या त्यांना, पण बाहेर नको, सेमिनार हॉलमध्येच बसत जा. तुम्ही चांगली मुलं आहात हे मला माहिती आहे, तुम्ही या मुलांना एमएस्सीचा अभ्यास कसा करायचा असतो, ते शिकवू शकता... आणि बेसिक पक्कं करून घ्या त्यांचं" आम्ही ते ऐकून गारच पडलो. एक तर आपली तक्रार गेली, त्यात सरांनी आपली बाजू घ्यावी, मला तर ज्युनिअर्सवर चिडावं की सरांचे आभार मानावे तेच कळत नव्हतं.

आम्ही बाहेर आलो, तर श्रद्धा वाट पाहत होती.

"म्हणजे आमची तक्रार केली तुम्ही, नाही ?" मनोज चिडला.

"सर त्यात माझी काहीच चूक नव्हती. एचओडी सरांनी वर्गात विचारलं तेव्हा सगळ्यांनीच हात वर केले होते, तक्रारीसाठी. "

हे नवीनंच कळलं आम्हाला.

"मग? "

"आधी एचओडीसरांनी सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि मग आम्हाला चांगलंच झापलं. तुम्ही आमचे बेसिक क्लिअर करून घेत आहे, त्याचा आम्हाला त्रास होतोय, हे चालणार नाही असं म्हणाले. आणि सगळ्या ज्युनिअर्सने सगळ्या सीनिअर्सची माफी मागावी, असही म्हणाले, म्हणून ... "

"अच्छा, म्हणजे सर म्हणाले म्हणून तुम्ही .... "

"नाही सर, तसं नाही"

"कशाला आम्ही स्वतःचा वेळ तुमच्यासाठी द्यायचा? म्हणजे आम्ही मेहनत घ्यायची, तुमच्यासाठी अन तुम्ही तक्रार करणार... जा काही इंट्रो-बिंट्रो होणार नाही" मनोजने सुनावलं अन मला जवळजवळ ओढतच घेऊन गेला.

"अबे पण तिचा त्यात काय दोष?"

"तू लेका जसाच्या तसा राहणार"

"म्हणजे? "

"अबे पोरींचे फक्त भेजेच पाहणार का तू ? ती इतकी सुंदर आहे.. "

"ओ भाऊ ... ती लाख सुंदर असेल पण मी काही राजकुमार नाही"

"पण भावी गोल्डमेडॅलिस्टतर आहे नं" मन्यानी मला हरबऱ्याच्या झाडावर चढवण्याचा प्रयत्न केला. मला ते लक्षात आलं पण मी काही बोललो नाही. त्याला वादात हरवणं, मलातरी अशक्य होतं. मी चुपचाप हो म्हणालो. त्याच्या अंदाजानुसार श्रद्धा दुसऱ्याच दिवशी मला भेटली. तिने बरेचदा माफी मागितली. ती सरळ मनाची असल्याचं मला तेव्हाच लक्षात आलं. पुढे सामोपचाराने पुन्हा इंट्रो सुरू झालं, मात्र नंतर केवळ फिजिक्सचेच प्रश्न विचारल्या जात होते, त्यामुळे माझाही अभ्यास वाढू लागला. महिन्याभरात "फ्रेशर्स पार्टी" झाली अन मग आम्ही सगळे मित्र झालो.

आमच्या विनंतीला एचओडींनी होकार देत आम्हाला एक विशेष डिपार्टमेंटला लायब्ररी कम स्टडी रुम उपलब्ध करून दिली होती. त्यात मी बसून असताना बरेचदा श्रद्धा तिच्या अभ्यासातल्या अडचणी विचारत असे.

फार सुखाचे दिवस होते ते. मी एक सुस्कारा सोडला.

आमची छोटी लायब्ररी एक प्रकारे चर्चेचे ठिकाण झाले होते. खरं तर श्रद्धाला माझी मतं कधीच पटत नसे, त्यामुळे आमची चर्चा नेहमीच भांडणाच्या सुरात चालायचे. मग विषय सापेक्षतेचा सिद्धांत असो की राजकारण.

असेच दिवस भराभर निघून गेले. माझं एमएस्सी झालं आणि त्याच कॉलेजला मी शिकवायला लागलो. माझं लेक्चर झालं की श्रद्धाचे प्रश्न तयारच असायचे. नेटची तयारी करण्यासाठी मी लायब्ररीतच बसत असे, त्यामुळे श्रद्धाची आणि माझी रोजच भेट होत असे. पण तिचं एमएस्सी झालं अन ती एक दिवस मला भेटायला आली.

"सर, उद्यापासून मी नाही येऊ नाही शकणार"

"हम्म.... अभ्यास मात्र सोडू नकोस, तू नेट सहज होऊ शकशील"

"नाही सर. घरी राहून अभ्यास करणे शक्य नाही"

"पण.. "

"सर, एक विचारू ? "

"हा विचार ना.. "

"तुम्हाला माझी आठवण येईल. "

"व्वा, का नाही येणार ? खरं सांगायचं तर तू माझी सर्वात जवळची मैत्रीण आहेस. "

"खरंच? "

"हो. का विश्वास नाही बसत ? तुझं भांडणं मी मिस करेन "

"एक सांगू ? "

"हा"

"मी मुद्दामच तुमच्याशी भांडत होती"

"म्हणजे? "

"म्हणजे एखाद्या गोष्टीचे वेगवेगळे पैलू माहिती होण्यासाठी, मी मुद्दामच तुमच्या विरुद्ध बाजूने बोलायची. त्यातून मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या, ज्या मी जन्मभर विसरू शकणार नाही. अर्थात जीवनात पुढेही तुमच्याशी असे भांडणं करायला निश्चितच आवडेल... "

ती माझी अन श्रद्धाची शेवटची भेट. त्यानंतर ती स्वतःहून कधी भेटायला आली नाही, ना मी कधी तिच्याशी संपर्क ठेवू शकलो नाही. शेवटी मला माझं करिअर बनवण्यावर जास्त लक्ष देणे आवश्यक होते. बाकी विद्यार्थी होतेच, त्यांच्याशी चर्चा करण्यात वेळ जात होताच. श्रद्धाच्या मैत्रिणी आता माझ्यासोबत अभ्यासाला बसायच्या. अन नेटच्या तयारीत मी गेट पास झालो, आणि मग गडबडच झाली. एमटेक का पीएचडी, हे कॉलेज की ते, ऍडमिशन फॉर्म, कागदपत्र, मुलाखती, सगळ्यांमध्ये २-३ महिने निघून गेले. अन मला इंदौरला ऍडमिशन मिळाली. पण "मायग्रेशन सर्टिफिकेट" तेव्हडं घ्यायचं राहिलं, त्यासाठीच आताची ही चक्कर.

आतापर्यंत माझा फुटबॉल करून मला टोलवण्याचा खेळ अचानक थांबला होता. बस एकदम जसं विमान चालावं तशी स्मुथली चालत होती. मला लक्षात आलं की आता आपण महाराष्ट्रात आलो आहे. बहुदा मुक्ताईनगर आलं असावं, असा विचार केला अन चांगली ताणून दिली.

अमरावतीत पोहचलो तेव्हा दिलीप मला घ्यायला आला होताच. थोडंसं फ्रेश होऊन मी विद्यापीठाचं काम आटोपलं, अन मंगल कार्यालयात पोहचलो.

"हे विजय सर... " दिलिपने एका गृहस्थाशी ओळख करून दिली. त्यांना खास कोल्हापुरी फेटा बांधला होता, त्यावरून ते श्रद्धाचे वडील असावेत, असा मी अंदाज बांधला.

"अरे व्वा ! तुम्ही आलात सर, मला खूप आनंद झाला. गेले २-३ वर्ष तुमच्याबद्दल श्रद्धाकडून ऐकलं होतं, आज भेट झाली".

"या सर, श्रद्धा नेहमी तुमच्याबद्दल सांगायची. तुम्ही एमटेक करत आहात हे ऐकून मला खूपच आनंद झाला. " श्रद्धाच्या आईने आम्हाला आत नेलं. त्यांचं श्रद्धा माझ्याबद्दल काय काय सांगायची, हे ऐकवणं सुरूच होतं. एखाद्या ज्युनिअरच्या घरी मी इतका माहिती असेन असं मला कधीच वाटलं नव्हतं.

थोड्याच वेळात बाकी ज्युनिअर्स आले, मग त्यांचेशी गप्पा करण्यात मी मश्गुल झालो. लग्न लागलं अन मग सुलग्न. सुलग्नाच्या वेळी श्रद्धाने "सर तुम्ही इथे या" असं म्हणत मला तिच्याशेजारी उभं करत फोटो काढायला लावला. तिला मी बरेचदा बघितलं होतं, पण ते कॉलेजमध्ये. ती मेकअप न करताच सुंदर दिसायची, आणि आता तर चक्क लग्नात, ती अगदी ऐश्वर्यापेक्षाही सुंदर दिसत होती. थोड्यावेळात आम्ही खाली उतरलो अन सरळ बफेकडे वाट केली.

"काय करतो नवरा मुलगा?" मी सहज विचारलं

"आय टी वाला आहे सर तो... " दिलिपनं माहिती पुरवली.

"हं म्हणजे दन्न कमावणारा... " दुसरा बोलला.

उगाच इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्या. जेवण संपलं अन आम्ही निघायच्या तयारीत होतो, पण दिलिपने थांबवून घेतलं. जवळजवळ सगळे मित्र-मैत्रिणी चित्रपटासाठी गेले. मला जागरणामुळे झोप यायला लागली होती.

"मला ताईकडे सोडून देशील का ? " मी दिलिपला विचारलं

"सर, जेवण व्यवस्थित झालं नं" मागून येत श्रद्धानं विचारलं.

"हो हो, अगदी छान" मी म्हटलं. खरं तर ती काय बोलतेय याकडे माझं फारसं लक्षच नव्हतं. दोन वर्षात मी श्रद्धाला कित्येकदा बघितलं असेल, मनोजने तिच्यावरून चिडवलंही होतं, पण मला तिच्याबद्दल आकर्षण असं वाटलं नव्हतं. पण याक्षणी ती इतकी सुंदर दिसत होती की ....

"सर, हे तुमच्यासाठी... " तीने गुलाबांचा एक सुंदरसा बुके मला दिला.

"हे ... ? "

"तुमच्या गेटसाठी आणि एमटेकच्या ऍडमिशनसाठी"

"थँक्यू ... " इतक्यात तिला कोणीतरी बोलावलं.

"का रे, ही इतकी सुंदर, अन हिला नवरा काळाडोमडा मिळावा, काय दुर्दैव आहे. " मी दिलिपशी इतक्या वेळ दाबून ठेवलेलं माझं मत सांगितलं.

"सर मी पण काळाच आहे नं ? " शेवटी तो श्रद्धाचा जवळचा मित्र होता, त्याला वाईट वाटले असावे.

"अरे पण तू स्मार्ट आहेस, तो कसा एकदम भदाडा वाटत आहे, अगदी लंगूर के गले मे अंगूर म्हणतात तसं झालं, वाईट वाटते यार"

"आता वाईट वाटून काय उपयोग ?"

"म्हणजे? "

"जेव्हा ती तुमच्या जवळ होती, तेव्हा तुम्हाला तो आईन्स्टाईन जास्त प्रेमाचा वाटला... तेव्हाच मनात आणलं असतं तर नवरदेवाच्या खुर्चीत तुम्ही असते"

"अरे पण मी विचार करून काय उपयोग होता, तिला पसंत पडायला नको होतो का मी ?"

"हो ! ती काय लाऊडस्पीकर घेऊन सांगणार होती तुम्हाला.... "

"म्हणजे श्रद्धा ... "

"हो, पण तुम्हाला ती समोर असतानाही फोटॉन अन बोसॉन जवळचे वाटत होते.... दुर्दैव तिचं"

"अरे पण तू हे आधी नाही सांगायचं... "

"किती वेळा सर ? किती वेळा ? "

"म्हणजे ? "

"म्हणजे काय म्हणजे ? तुमची सीनिअर, वर्षा मॅडम, मग तुमचीच बॅचमेट अनुजा मॅडम, मग श्रद्धा .... आणि नंतर .... जाऊ द्या... तिकडे त्या पोरी एकमेकींशी तुमच्यावरून भांडत होत्या, अन तुम्ही श्रॉडिंजर अन आईन्स्टाईनचं भांडण सोडवायचा प्रयत्न करत होते...."

"पण .... "

"आता काही उपयोग नाही... सगळ्यांचे लग्न झाले .... ही शेवटची... "

हे ऐकून माझं डोकं भणभणायला लागलं.

"चला आता ... एम टेकमध्ये तरी सुधरा.... " दिलीप चिडून बोलला.

ताईकडे आलो. तिने काही म्हणायच्या आतच मी म्हणालो, " जागरणानं माझं डोकं दुखतंय, मी झोपतो, मला उठवू नको. "

किती वेळ झाला होता कुणास ठाऊक, मला कोणीतरी गदागदा हालवून जागं करत होतं,

"सायली... कशाला मला उठवत आहे? झोपू दे मला .. "

"मामा, अरे सकाळचे ९ वाजले, किती झोपणार ? "

"९ ? बापरे, म्हणजे मी रात्री जेवलोसुद्धा नाही"

"नाही नं, उठ, आईनी चहा केला आहे, ब्रश कर पटकन.. मग तुला एक गंमत दाखवते, मी केलेली. "

"कसली गंमत ? "

ती माझ्यासमोर एक काचेची बाटली घेऊन आली.

"हे बघ, तू काल गुलाब आणले होते ना, मी त्याचा गुलकंद बनायला ठेवला आहे ... "

मी हताशपणे त्या प्रेमाच्या गुलकंदाकडे पाहत होतो.

४ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

Are yaar! bhai kya baat hai dil ko chhunewali baat kahi hai,
Hya story war ekhada picture banu shakto.
Jabardast, maja aali.
Keep it up...

Zahir

Vijay Deshmukh म्हणाले...

धन्यवाद झहिर !!

सौरभ म्हणाले...

सुरेख रे सुरेख

Vijay Deshmukh म्हणाले...

धन्यवाद सौरभ.