सोमवार, २३ ऑगस्ट, २०१०

चिरकूट

जीवनात वेगवेगळ्या तऱ्हेचे नमुने बघायला मिळतात. काही अती उधळे, काही हिशोबी तर काही चिरकुट असतात. पैसे असूनही खर्च करण्याची त्यांची अजिबात इच्छा नसते, असेच काही नमुने प्रत्यक्ष बघायला मिळाले तर काही ऐकीव.

आपण पैसे कमावतो ते कशासाठी ? पहिलं उत्तर बहुदा खाण्यासाठी, असच येईल. पण खाण्यावरच खर्च न करणारी मंडळी बघितलीय ? मी कोरियात आलो, तेव्हा एका महाभागाने मला सांगितले, की इथे फक्त डाळ, भात आणि पोळी खा, भाज्या चुकूनही खाऊ नका. मला आश्चर्यच वाटले. सहसा भाज्या भरपूर खा, असे सांगितले जाते, पण हे तर उलटच ! जेव्हा मी त्यांना अधिक छेडले, ते म्हणाले, "इथे प्रत्येक भाजी २-३ $ला मिळते. ती एक दिवस पुरेल. समजा तुम्ही डाळ, छोले, असे पदार्थ खाल्ले तर ते एका किलोला ३ $ पडेल. म्हणजे एक किलो डाळ आणि पावभर भाजी यांची किंमत सारखी आहे, काय समजलात ? " मी हो म्हटले आणि बायकोला सांगितले, "जेव्हा पुन्हा कधी यांना जेवायला बोलवशील, तेव्हा फक्त खिचडीच कर"

एका वर्षातच मी घर बदलवले. महिना ६०$ची बचत. घर दूर होते म्हणून सायकल घेतली. त्यावर काही लोकांची मल्लीनाथी. अरे सायकल कशाला घेतली, हिवाळ्यात बर्फ राहील तर कशी चालवशील ? इथे सायकल घेणारा बहुदा मी पहिला किंवा दुसरा भारतीय असावा. चार वर्ष राहायचेच हे माहिती असतानाही ६० $ खर्च करून आणि नंतर ३०$ ला त्याच सायकलवाल्याला विकता येईल, हे माहिती असूनही सायकलसारखी आवश्यक गोष्ट न घेणारे भरपूर आहेत. मी जेव्हा विद्यापीठात किंवा घरी जाताना दिसलो की असूयेने बघतात. (कारण भूक लागलेली असते ना ) पण सायकल नाही घेणार.

जाऊ द्या. सायकल फार मोठी गोष्ट होईल. इथे काही बॅचलर्स राहतात तर काही फॅमिली. असच एकदा एकाला म्हणालो, " चल तुझ्या रूमवर जाऊ" तर म्हणाला, " थांब मी xxxx कडून किल्ली घेऊन येतो". मला वाटले याची किल्ली हरवली की काय. पण नाही. हे दोन पठठे ३ वर्ष सोबत राहत होते पण डुप्लिकेट किल्ली बनवली नाही. किंमत किती फक्त २ $. (एका वेळच्या भाजीपेक्षाही कमी. . तीन वर्ष हा त्याच्याकडून अन तो ह्याच्याकडून किल्ली घेऊन घरी जात होता. विशेष म्हणजे दोघांच्या लॅबमध्ये ५-७ मिनिटांचे अंतर ... आता बोला.

याहिपेक्षा महान व्यक्तीबद्दल. हे सेवानिवृत्त प्राध्यापक होते. भारतात कोण्या एका कॉलेजात नोकरीस होते अन मग त्यांना इथिओपियाला २-३ वर्षाचा काँट्रॅक्ट मिळाला. तिथे पगार डॉलरमध्ये मिळायचा आणि तोही रोख. हा पैसा भारतात पाठवण्याची घाई बघून आम्हाला दर महिन्याला हसू यायचे. १ तारखेला त्यांचं सकाळचं लेक्चर असेल, तर ते दुसऱ्याला देऊन स्वतः हे बँकेच्या बाहेर ८:३० लाच हजर असायचे. ९ ला बँक उघडली की पगाराच्या रांगेत धावत जायचे. पगार मिळाला की मोजण्यापूर्वीच डफातच रांगेत महाशय हजर. तिथे एक दिवस आधीच धनादेशासाठी अर्ज करावा लागायचा. तो एक दिवस व्याज बुडेल, म्हणून या प्राध्यापकांचा बँकेवर रोष होता. मात्र दुसऱ्या महिन्यापासून त्यांनी युक्ती केली. पगाराच्या एक दिवस आधीच धनादेशासाठी अर्ज. स्वतःसाठी जेवणापुरते पैसे ठेवून आणि नोकरांसाठी असलेल्या घरांमध्ये राहून (कारण प्राध्यापकांच्या घराचे भाडे २०० $ आणि नोकरांसाठी असलेले घरे १२० $ होते), पैसे वाचवायचे.

असेच ४-५ व्या महिन्यातील पगाराचा दिवस असावा. आम्ही सगळे १० च्या दरम्यान बँकेत पोहचलो. बघतो तर काय, प्राध्यापक महोदय बँक कर्मचाऱ्याशी भांडत होते. झाले असे, की त्या महिन्यात पगार १ तारखेला झालाच नाही. त्यामुळे प्राध्यापक महोदयांनी धनादेशासाठी दिलेला अर्ज वाया गेला. आता धनादेश तर बनला होता, तो रद्द करण्याचे ५० $ द्यावे लागणार होते. ते द्यायला प्राध्यापक महोदय तयार नव्हते. त्यात प्राध्यापकांचा तोल गेला, अन ते काहीतरी बरळले. तिथल्या महिला कर्मचाऱ्यावर धावून गेले. झालं. सरळ त्या बँक कर्मचाऱ्याने पोलिस बोलावले. मग काय, धावपळ, आमचं पोलिसांना समजावणं, वगैरे वगैरे... मग कायदेशीररीत्या ३०० $ भुर्दंड आणि केस न करण्यासाठी २०० $ पोलिसांना आणि धनादेश बनवायचे ५० $ आणि रद्द करण्याचे ५० $ प्राध्यापकांनी कसेबसे (इतरांना मागून, कारण त्यांच्याजवळ होतेच कुठे ? ) दिले. . पुढच्या महिन्यात ते १ तारखेला बँकेत दिसणार नाही, अशी अपेक्षा होती.

पण कुत्र्याचे शेपूट म्हणतात तसंच झालं. आम्ही १० वाजता पोहचलो, तेव्हा ते घेतलेला धनादेश भारतात पाठवण्यासाठी पोस्टात जात होते.

६ टिप्पण्या:

विजयसिंह होलम म्हणाले...

अरे वा! खूप सुंदर ब्लॉग आहे. इतके दिवस मी कसा पाहिला नाही. मस्त, लिहित रहा.

आदित्य चंद्रशेखर म्हणाले...

फूल टू चिंधी असतात रे लोक! माझा एक मित्र असाच होता. कधी सगळ्या मित्रांनी शेअर रिक्षा केली आणि कुणाकडे जर याचे दोन रुपये राहिले तरी लगेच मागून घ्यायचा. १ नंबर चिंधी होता तो!

आदित्य चंद्रशेखर म्हणाले...

फूल टू चिंधी असतात रे लोक! माझा एक मित्र असाच होता. कधी सगळ्या मित्रांनी शेअर रिक्षा केली आणि कुणाकडे जर याचे दोन रुपये राहिले तरी लगेच मागून घ्यायचा. १ नंबर चिंधी होता तो!

Vijay Deshmukh म्हणाले...

धन्यवाद विजयजी. तुमचा ब्लोग मात्र सत्यघटनेवरील भाष्य असते, आम्ही काय कल्पनेत रमणारे... :)

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

Vijay Deshmukh म्हणाले...

@ आदित्य :- बापरे १ रुपयासुद्दा सोडत नव्हता... कमाल असते ना लोकांची. अश्याने काय बंगले बांधणार आहेत का हे लोक :)

गुरुदत्त म्हणाले...

धन्यवाद विजय, माझ्या ब्लॉगवरचे तुझे अभिप्राय वाचले. तू संशोधन करतो आहेस हे वाचून फार आदर वाटतो आहे. मला chimangokhale@gmail.com वर मेल टाक. आपल्याला बोलायलाच हवंय.

BTW, तुझा हा लेख आवडला. छान लिहीतोस. हळूहळू वाचून काढेन.