प्रत्येक माणसाला (विशेषतः पुरुषाला) हव्या त्या गोष्टी मिळतात, फक्त त्याची वेळ चुकलेली असते. त्याचे कारण म्हणजे स्त्रीहट्ट असावा. (स्त्री = आई किंवा बायको).
लहानपणी सर्वात प्रिय गोष्टींपैकी दोन म्हणजे खेळ आणि झोप. पण आई नामक प्राण्यामुळे झोपेचे खोबरे आणि खेळाचे पानिपत व्हायला वेळ लागत नाही. जेव्हा बाळ १-२ वर्षाचं असतं तेव्हा त्याला खेळावंस वाटतं, पण आई त्याला "झोप रे आता" म्हणत जबरदस्तीने झोपवते. खायचे नसेल तर जबरदस्तीने खाऊ घालते.
हेच बाळ जेव्हा शाळेत जाऊ लागते, तेव्हा त्याच्या सकाळच्या झोपेत व्यत्यय आणत, "अरे ऊठ रे आता... शाळेची वेळ झाली ...." अश्या प्रेमळ सूचनांपासून "आता उठतोस की येऊ मी " अश्या धमक्या देत उठवते. खेळायला जायच्यावेळी "आधी खवून घे" चा धोशा चालू असतो. आणि परत आल्यावर प्रचंड भूक लागली असताना " संध्याकाळच्यावेळी जेवू नये, थांब जरा" म्हणत ताटकळत ठेवते. जेवण होताच झोप येऊ लागते, पण "होमवर्क कोण करणार... " म्हणत अभ्यास घेते.
उन्हाळ्यात आंबे खायची वेगळीच मजा असते, असं फक्त पुस्तकातच वाचायचं असते. कारण "बस कर रे आता, एक खाल्ला नं, आता उद्या" असं म्हणत तेही सुख मिळू देत नाही.
जेव्हा हेच बाळासाहेब कॉलेजात जातात, परगावी राहतात आणि सुट्टीत अभ्यास घेऊनच घरी येतात, तेव्हा नको असताना, "किती वाळलास म्हणत वर्षभराचं खाण्याचं सामान १५ दिवसात संपवण्याचा सपाटा लावते. उन्हाळ्याच्या सुटीत डॉक्टरकडे जायची वेळ येईपर्यंत आंब्याचा रस खाऊ घालते. रात्री अभ्यास करावा की हि आलीच. "राहू दे रे अभ्यास, तो काही पळून नाही चालला" म्हणत झोपायचा आग्रह करते. आणि सकाळीसुद्धा उठवत नाही.
लग्नानंतरतरी आपल्या मनासारखं वागता येईल तर शपथ. कारण त्यावेळी मातोश्रीच्या रूपातच बायको नामक प्राणी गळ्यात बांधला असतो. मधुचंद्राला गेल्यावर सकाळी भूक लागली म्हणून ब्रेकफास्टसाठी उठावं तर, " ए, काय हे, झोप न थोड्यावेळ" म्हणत ती ओढून घेते, पण तिकडून परत आल्यावर घरी जरा झोपावं म्हटलं तर, " अहो आवरा, ७:४० ची सुटेल" पासून "आता उठताय की पाणी आणू " अश्या धमक्या सुरू होतात. सकाळी ब्रेकफास्ट नको म्हणत असताना कोंबला जातो. दोन पोळ्यांची भूक असली तरी ४-५ पोळ्या, वरण, भात, भाजी (झक्कास तर्रीवाली), चटण्या, आणि हे कमी झालं म्हणून संत्री/ मोसंबी वगैरे फोडी करून डब्यात दाबून भरलेली असतात. असं वाटते की सालं हॉस्टेलला असतानाच लग्न केलं असतं तर पोटाचा प्रश्न सुटला असता. पण हे सगळं वर्ष दोन वर्ष. तेव्हड्यात वजन आणि पोट चांगलंच वाढलेलं असतं.
मुलं झाली की, "डबा भरून घ्या आणि चिंटूचाही डबा भरा. आधी त्याला सोडा मगच ७:४० पकडा." स्वतः उठा आणि चिंट्यालाही उठवा. म्हणजे दुसरंही पाप करा, पोराला झोपू न देण्याचं. रवीवारीसुद्धा जॉगिंग टळत नाही आणि पोट (वाढलेलं) कमी होत नाही. वाढत्या वजनाला जास्त जेवण हवं असतं. एव्हाना चमचमीत खाण्याची सवयही झाली असती, पण तिच्या माहेरचा कोणी डॉक्टर सांगतो अन चमचमीत पदार्थांच्या जागी कारली, दुधी भोपळा, कच्ची भाजी, गाजर वगैरे कंदमूळं खाण्याची पाळी येते.
स्वतःचं वजन सांभाळत नसताना, "जरा चिंट्यासोबत खेळा हो" असं म्हणत वजन कमी करण्यासाठी बॅटमिंटन वगैरे प्रयोग केल्या जातात. लहाणपणी बॅटमिंटनची फुलं परवडत नाही म्हणून वर्षानुवर्षे त्या बॅटस खिळ्यावर आणि मग माळ्यावर पडलेल्या असतात, त्या निघतात त्या अश्या.
पन्नाशीनंतर बऱ्याच गरजा आणि काळज्या कमी होतात. वयोमानानुसार झोपही कमी होते. आता जरा योगासनं वगैरे करून तब्येत ठाकठीक करावी म्हटलं की , " आयुष्यात जरा कधी शांतपणे झोपू द्याल का ? " असं म्हणत सौ. त्याला मोडता घालणारच. पण पुढे ५-१० वर्षात म्हणणार, "सकाळी उठत जा आता, योगासनं करा, फिरायला जा.... आता रिटायर्ड झाल्यापासून नुस्ते घरात बसून असता ...." सुनबाईने काही चांगले पदार्थ केले की, " त्यांना सहन होत नाही, त्यांना नको देऊस" म्हणत उपासमार केली जाते.
ऐनकेन प्रकारेण आमची वाट लावण्याचा वसा त्यांनी सासुबाईंकडून घेतला असतो, तो काही टाकत नाही ....
थोडक्यात सगळ्या गोष्टी मिळतात पण नको तेव्हा आणि जेव्हा हव्या तेव्हा ह्या दोघींपैकी कोणीतरी एक मिळू देत नाही... काय करणार आम्ही पडलो पुरुष बिच्चारे !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा