गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०१०

मी म्हणालो तिला

मी म्हणालो तिला,

बघ किती सुंदर फुललाय चाफा,

ती मला म्हणते,

ती सुरी घ्या अन चार कांदे कापा.



मी म्हणालो तिला,

बघ किती छान सुटलाय वारा

ती मला म्हणते,

त्या कढईत फिरवा जरा झारा.



मी म्हणालो तिला,

तुझ्या गंधाने होतोय मी धुंद,

ती मला म्हणते,

तो गॅस करा जरा मंद.



मी म्हणालो तिला,

तूच आहेस माझ्या जीवनातला ठेवा,

ती मला म्हणते,

कढईवर जरा झाकण ठेवा.



मी चिडून म्हणालो,

बस्स तुम्ही रांधा, वाढा, उष्टी काढा,

ती मला म्हणते,

तुम्ही जरा जाऊन पडा.



गालावरून फिरले ओले केस,

बाहेर कोसळल्या पावसाच्या धारा,

जवळ घेताच ती म्हणाली,

आधी खाऊन घ्या बदामाचा शिरा .........

सोमवार, २३ ऑगस्ट, २०१०

चिरकूट

जीवनात वेगवेगळ्या तऱ्हेचे नमुने बघायला मिळतात. काही अती उधळे, काही हिशोबी तर काही चिरकुट असतात. पैसे असूनही खर्च करण्याची त्यांची अजिबात इच्छा नसते, असेच काही नमुने प्रत्यक्ष बघायला मिळाले तर काही ऐकीव.

आपण पैसे कमावतो ते कशासाठी ? पहिलं उत्तर बहुदा खाण्यासाठी, असच येईल. पण खाण्यावरच खर्च न करणारी मंडळी बघितलीय ? मी कोरियात आलो, तेव्हा एका महाभागाने मला सांगितले, की इथे फक्त डाळ, भात आणि पोळी खा, भाज्या चुकूनही खाऊ नका. मला आश्चर्यच वाटले. सहसा भाज्या भरपूर खा, असे सांगितले जाते, पण हे तर उलटच ! जेव्हा मी त्यांना अधिक छेडले, ते म्हणाले, "इथे प्रत्येक भाजी २-३ $ला मिळते. ती एक दिवस पुरेल. समजा तुम्ही डाळ, छोले, असे पदार्थ खाल्ले तर ते एका किलोला ३ $ पडेल. म्हणजे एक किलो डाळ आणि पावभर भाजी यांची किंमत सारखी आहे, काय समजलात ? " मी हो म्हटले आणि बायकोला सांगितले, "जेव्हा पुन्हा कधी यांना जेवायला बोलवशील, तेव्हा फक्त खिचडीच कर"

एका वर्षातच मी घर बदलवले. महिना ६०$ची बचत. घर दूर होते म्हणून सायकल घेतली. त्यावर काही लोकांची मल्लीनाथी. अरे सायकल कशाला घेतली, हिवाळ्यात बर्फ राहील तर कशी चालवशील ? इथे सायकल घेणारा बहुदा मी पहिला किंवा दुसरा भारतीय असावा. चार वर्ष राहायचेच हे माहिती असतानाही ६० $ खर्च करून आणि नंतर ३०$ ला त्याच सायकलवाल्याला विकता येईल, हे माहिती असूनही सायकलसारखी आवश्यक गोष्ट न घेणारे भरपूर आहेत. मी जेव्हा विद्यापीठात किंवा घरी जाताना दिसलो की असूयेने बघतात. (कारण भूक लागलेली असते ना ) पण सायकल नाही घेणार.

जाऊ द्या. सायकल फार मोठी गोष्ट होईल. इथे काही बॅचलर्स राहतात तर काही फॅमिली. असच एकदा एकाला म्हणालो, " चल तुझ्या रूमवर जाऊ" तर म्हणाला, " थांब मी xxxx कडून किल्ली घेऊन येतो". मला वाटले याची किल्ली हरवली की काय. पण नाही. हे दोन पठठे ३ वर्ष सोबत राहत होते पण डुप्लिकेट किल्ली बनवली नाही. किंमत किती फक्त २ $. (एका वेळच्या भाजीपेक्षाही कमी. . तीन वर्ष हा त्याच्याकडून अन तो ह्याच्याकडून किल्ली घेऊन घरी जात होता. विशेष म्हणजे दोघांच्या लॅबमध्ये ५-७ मिनिटांचे अंतर ... आता बोला.

याहिपेक्षा महान व्यक्तीबद्दल. हे सेवानिवृत्त प्राध्यापक होते. भारतात कोण्या एका कॉलेजात नोकरीस होते अन मग त्यांना इथिओपियाला २-३ वर्षाचा काँट्रॅक्ट मिळाला. तिथे पगार डॉलरमध्ये मिळायचा आणि तोही रोख. हा पैसा भारतात पाठवण्याची घाई बघून आम्हाला दर महिन्याला हसू यायचे. १ तारखेला त्यांचं सकाळचं लेक्चर असेल, तर ते दुसऱ्याला देऊन स्वतः हे बँकेच्या बाहेर ८:३० लाच हजर असायचे. ९ ला बँक उघडली की पगाराच्या रांगेत धावत जायचे. पगार मिळाला की मोजण्यापूर्वीच डफातच रांगेत महाशय हजर. तिथे एक दिवस आधीच धनादेशासाठी अर्ज करावा लागायचा. तो एक दिवस व्याज बुडेल, म्हणून या प्राध्यापकांचा बँकेवर रोष होता. मात्र दुसऱ्या महिन्यापासून त्यांनी युक्ती केली. पगाराच्या एक दिवस आधीच धनादेशासाठी अर्ज. स्वतःसाठी जेवणापुरते पैसे ठेवून आणि नोकरांसाठी असलेल्या घरांमध्ये राहून (कारण प्राध्यापकांच्या घराचे भाडे २०० $ आणि नोकरांसाठी असलेले घरे १२० $ होते), पैसे वाचवायचे.

असेच ४-५ व्या महिन्यातील पगाराचा दिवस असावा. आम्ही सगळे १० च्या दरम्यान बँकेत पोहचलो. बघतो तर काय, प्राध्यापक महोदय बँक कर्मचाऱ्याशी भांडत होते. झाले असे, की त्या महिन्यात पगार १ तारखेला झालाच नाही. त्यामुळे प्राध्यापक महोदयांनी धनादेशासाठी दिलेला अर्ज वाया गेला. आता धनादेश तर बनला होता, तो रद्द करण्याचे ५० $ द्यावे लागणार होते. ते द्यायला प्राध्यापक महोदय तयार नव्हते. त्यात प्राध्यापकांचा तोल गेला, अन ते काहीतरी बरळले. तिथल्या महिला कर्मचाऱ्यावर धावून गेले. झालं. सरळ त्या बँक कर्मचाऱ्याने पोलिस बोलावले. मग काय, धावपळ, आमचं पोलिसांना समजावणं, वगैरे वगैरे... मग कायदेशीररीत्या ३०० $ भुर्दंड आणि केस न करण्यासाठी २०० $ पोलिसांना आणि धनादेश बनवायचे ५० $ आणि रद्द करण्याचे ५० $ प्राध्यापकांनी कसेबसे (इतरांना मागून, कारण त्यांच्याजवळ होतेच कुठे ? ) दिले. . पुढच्या महिन्यात ते १ तारखेला बँकेत दिसणार नाही, अशी अपेक्षा होती.

पण कुत्र्याचे शेपूट म्हणतात तसंच झालं. आम्ही १० वाजता पोहचलो, तेव्हा ते घेतलेला धनादेश भारतात पाठवण्यासाठी पोस्टात जात होते.

बुधवार, १८ ऑगस्ट, २०१०

प्रेमाचा गुलकंद

बसनं इंदौर सोडलं आणि माझी झोप उडाली. ३० सीटर बसमध्ये २७ नंबरच्या सीटवर बसलेल्या आणि म. प्र. मधील रस्त्यांवर चालणाऱ्या बसमध्ये माणसाची हालत व्हॉलीबॉलसारखीच होते. मी अमरावती विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या नावाने शिव्या घालत, हा व्हॉलिबॉलचा खेळ कधी संपतो, याची वाट पाहत होतो. शरीराने जरी मी बसमध्ये असलो तरी मनाने कधीचाच अमरावतीला पोहचलो होतो.

खरं तर मला एका आठवड्यात 'मायग्रेशन सर्टिफिकेट' द्यायचे होते, म्हणून मी अमरावतीचा बेत आखला होता, पण त्यासोबतच श्रद्धाचं लग्नही अटेंड करायचं होतं. श्रद्धा माझ्या आवडत्या ज्युनिअरपैकी एक होती. खरं तर ती कोणालाही आवडेल अशीच होती. कॉलेजची ब्युटीक्वीन न आवडणारा एखादा आंधळाच असता.

माझ्या डोळ्यासमोरून ती २ वर्ष सरकत होती. श्रद्धाचा अन माझा पहिला परिचय झाला तो 'परिचय कार्यक्रमात'. खरं तर ती एक प्रकारची रॅगिंगच होती, मेंदूची.

"नाव ?"

"श्रद्धा" ती घाबरत हळू आवाजात म्हणाली.

"चढ्ढा ? " मी उगाचच चिडवलं.

"नाही .. श्रद्धा" ती पुन्हा म्हणाली.

तिच्या आधी जवळजवळ सगळ्याच मुलींना त्रास देऊन झालं होतं, त्यामुळे कदाचित तिने राग मानला नसावा. कारण तसं तिच्या चेहऱ्यावर दिसलं नव्हतं.

"हॉबी काय आहे तुमची ? "

आतापर्यंत ज्याने जी हॉबी सांगितली त्यात मी आणि मनोजने समोरच्याला प्रश्न विचारून पार हैराण केले होते. आणि आताही आम्ही संधी सोडणार नव्हतो.

"स्वयंपाक करणे" ती शांतपणे म्हणाली, तसं तिला राग का आला नव्हता, ते कळलं.

" तू विचार " मनोजने माझ्याकडे चेंडू टोलवला.

आता आम्हाला स्वयंपाकाबाबत तो कसाही असलातरी चापून खाणे आणि मेसवाल्याला दिलेले पैसे वसूल करणे, इतकंच माहिती होतं. आम्ही कधीही भाजी कसली आहे, अन त्यात काय टाकायला हवं होतं याही भानगडीत पडलो नव्हतो. पण माझ्याकडे आलेला चेंडू मुलींकडे सोपवणे म्हणजे घोर अपमान वगैरे वाटला, म्हणून सहज विचारलं,

"काय करता येते स्वयंपाकात? "

"शाकाहारी जवळजवळ सगळेच पदार्थ" हे ऐकून आमच्याच वर्गमैत्रिणी गालातल्या गालातल्या हसत असल्याचे मनोजच्या लक्षात आले अन ते त्यानं मला हळूच खुणावून दाखवलं.

"अच्छा... अशी खुन्नस काढत आहे का ?" मी मनाशीच म्हणालो. श्रद्धाही गालातल्या गालात हसत होती. माझं डोकंच फिरलं, पण कंट्रोल करत मी विचारलं,

"पुरणपोळी करता येते? "

"हो" ती इतकी सहजतेने म्हणाली की माझा आत्मविश्वास डळमळायला लागला. पालक म्हणून आंबटचुका आणणारा मी, कोहळ्याला रंगीत भोपळा म्हणून विकत घेणारा मी आणि असे अनेक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर दिसायला लागले. पण म्हणतात ना की माणूस घाबरला की रागावतो, अन तसंच झालं.

"कोणत्या डाळीचं करतात पुरण? "

"हरबऱ्याच्या" काय मूर्खासारखं विचारत आहे, असा भाव चेहऱ्यावर आणत ती म्हणाली. मी अजूनच इरेला पेटलो. उत्तरातून नवीन प्रश्न तयार करण्यात माझा हातखंडा होता, त्यानुसार मी विचारलं,

"का ? तुरीच्या डाळीचं नाही करता येत ? "

एखाद्याला एखादी गोष्ट करता येणे आणि त्याला असच का करायचं हे माहिती असणे यांत फरक असतो. ती विज्ञानाची विद्यार्थिनी होती गृहविज्ञानाची नाही. त्यामुळे तिची थोडी चलबिचल झाली.

"नाही म्हणजे करता येते पण .. "

"मग का नाही करत?" मी डाव परत हातात आल्याच्या आनंदात विचारलं.

"मला नक्की नाही माहिती पण मी उद्या सांगेन" तिचा आत्मविश्वास कमी पडला असावा.

"अहो तुमची हॉबी आहे ना ? मग कमीतकमी इतकं तरी माहिती पाहिजेच ना ? " मी उगाचच चिडवलं.

"तुम्ही दुसरं काही विचारा सर.. " ती जरा खिन्न होऊन म्हणाली.

"असं. बरं हे सांगा की चण्याच्या डाळीचं पुरण करता येते" मी पुन्हा मूळपदावर आलो.

"सर पुरण सोडून दुसरं काही ... "

"नाही ... उद्या तुम्ही विचारून या, मग बघू ..." असं म्हणत मी माझ्या वर्गमैत्रिणींकडे खुन्नसने बघितलं. त्यांचा चेहरा पडला होता.

********************************************************************

दुसऱ्या दिवशी ती तयारी करून आली असावी, कारण मी "पुरण" म्हणताच तिने सुरुवात केली.

"सर हरबरा आणि चणा डाळ एकच आहे"

"नक्की ?"

"हो सर मी आईला विचारून आलीय... आणि तुरीच्या डाळीचही करतात पण चव थोडी वेगळी असते ... "ती म्हणाली.

"मग काय शिकल्या तुम्ही यातून ?" मी उगाच फिलॉसॉफी झाडली.

"सर मी शिकली की माणसाला आत्मविश्वास असावा तर तुमच्यासारखा" हे ऐकून मी स्वतःच चकीत झालो तर वर्गमैत्रिणी जळून खाक.

आदल्या दिवशी विद्यापीठापासून दस्तुरनगर हे ८-१० किमी अंतर सायकलने जाऊन ताईकडून "चणा आणि हरबरा डाळीत काय फरक असतो हे समजून घेतलं होतं", याचं समाधान वाटलं होतं आणि आनंदही.

अश्याच काही प्रसंगांची उजळणी होत होती, पण मध्येच बसणाऱ्या धक्क्यांनी त्या धुंदीतून बाहेर येत होतो आणि पुन्हा त्या आठवणींत हरवून जात होतो.

आमचं इंट्रो (इंट्रोडक्शन) चांगलं चालू होतं. मी आणि मनोजच फक्त प्रश्न विचारत असल्यामुळे आम्ही दोघं सगळ्या ज्युनिअर्सच्या ओळखीचे झाले होतो. पण आमची कीर्ती इतकी पसरली असेल असं वाटलं नव्हतं. रोज कॉलेज ४:३० ला सुटायचं आणि आम्ही अर्धा तास ज्युनिअर्सला तासायचो. साधारण १५-२० झाले होते. आता आम्हालाही अभ्यासाला लागणे भाग होते, शेवटी थोडक्यात मजा असते. नेमकं ज्या दिवशी आम्ही हे रॅगिंग संपवणार होतो, त्याच दिवशी श्रद्धाचा भाऊ आला अन ती वर्गात न दिसल्याने सरळ आमच्या एच. ओ. डी. कडे गेला. एचओडी काही सांगणार त्याआधीच तो भडकला, अन झालं.

त्याच्या अपेक्षेनुसार एचओडी गयावया करतील असे वाटले पण झाले उलटेच. एचओडिने त्यालाच झापले, अन म्हणाले की पाहिजे असेल तर त्याच्या बहिणीची ऍडमिशन कॅन्सल कर. तो घरी जाऊन श्रद्धाला बोलला असावा. दुसऱ्या दिवशी एचओडीने आमची बाजू घेऊन सगळ्या ज्युनिअर्सला इतकं खडसावलं की बस्स... सगळे ज्युनिअर्स घाबरले.

त्या दिवशी आम्ही "इंट्रो" नाही म्हणून मी मनोजसोबत निघालोच होतो की श्रद्धा समोर आली. ती म्हणाली,

"सर, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं"

"हा, बोला ना" मला वाटलं की नोटस वगैरे मागेल. पण तिच्या डोळ्यात एकदम पाणी आलं. ती काही बोलणार इतक्यात फकडी आला. फकडी म्हणजे एचओडीचा प्युन. जसं वादळ यायच्या आधी फकड्या येतात तसा हा नेहमी एचोडीच्या क्लासच्या आधी यायचा म्हणून त्याचं नाव फकडी ठेवलं होतं.

"सरांनी बोलवलंय"

"मला ? " मी आश्चर्याने विचारलं कारण 'फी बाकी आहे' या एकाच कारणासाठी एचओडी बोलवायचे, पण माझीतर फी भरून झाली होती.

"दोघांनाही"

आम्ही एचओडीकडे गेलो. एचओडीने आम्हाला बसवले. आम्ही सर्द. आदल्या दिवशीचा श्रद्धाच्या भावाचा आणि नंतर त्यांनी ज्युनिअर्सला खडसावल्याचे सांगितले. मग म्हणाले,

"चांगलं तासून घ्या त्यांना, पण बाहेर नको, सेमिनार हॉलमध्येच बसत जा. तुम्ही चांगली मुलं आहात हे मला माहिती आहे, तुम्ही या मुलांना एमएस्सीचा अभ्यास कसा करायचा असतो, ते शिकवू शकता... आणि बेसिक पक्कं करून घ्या त्यांचं" आम्ही ते ऐकून गारच पडलो. एक तर आपली तक्रार गेली, त्यात सरांनी आपली बाजू घ्यावी, मला तर ज्युनिअर्सवर चिडावं की सरांचे आभार मानावे तेच कळत नव्हतं.

आम्ही बाहेर आलो, तर श्रद्धा वाट पाहत होती.

"म्हणजे आमची तक्रार केली तुम्ही, नाही ?" मनोज चिडला.

"सर त्यात माझी काहीच चूक नव्हती. एचओडी सरांनी वर्गात विचारलं तेव्हा सगळ्यांनीच हात वर केले होते, तक्रारीसाठी. "

हे नवीनंच कळलं आम्हाला.

"मग? "

"आधी एचओडीसरांनी सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि मग आम्हाला चांगलंच झापलं. तुम्ही आमचे बेसिक क्लिअर करून घेत आहे, त्याचा आम्हाला त्रास होतोय, हे चालणार नाही असं म्हणाले. आणि सगळ्या ज्युनिअर्सने सगळ्या सीनिअर्सची माफी मागावी, असही म्हणाले, म्हणून ... "

"अच्छा, म्हणजे सर म्हणाले म्हणून तुम्ही .... "

"नाही सर, तसं नाही"

"कशाला आम्ही स्वतःचा वेळ तुमच्यासाठी द्यायचा? म्हणजे आम्ही मेहनत घ्यायची, तुमच्यासाठी अन तुम्ही तक्रार करणार... जा काही इंट्रो-बिंट्रो होणार नाही" मनोजने सुनावलं अन मला जवळजवळ ओढतच घेऊन गेला.

"अबे पण तिचा त्यात काय दोष?"

"तू लेका जसाच्या तसा राहणार"

"म्हणजे? "

"अबे पोरींचे फक्त भेजेच पाहणार का तू ? ती इतकी सुंदर आहे.. "

"ओ भाऊ ... ती लाख सुंदर असेल पण मी काही राजकुमार नाही"

"पण भावी गोल्डमेडॅलिस्टतर आहे नं" मन्यानी मला हरबऱ्याच्या झाडावर चढवण्याचा प्रयत्न केला. मला ते लक्षात आलं पण मी काही बोललो नाही. त्याला वादात हरवणं, मलातरी अशक्य होतं. मी चुपचाप हो म्हणालो. त्याच्या अंदाजानुसार श्रद्धा दुसऱ्याच दिवशी मला भेटली. तिने बरेचदा माफी मागितली. ती सरळ मनाची असल्याचं मला तेव्हाच लक्षात आलं. पुढे सामोपचाराने पुन्हा इंट्रो सुरू झालं, मात्र नंतर केवळ फिजिक्सचेच प्रश्न विचारल्या जात होते, त्यामुळे माझाही अभ्यास वाढू लागला. महिन्याभरात "फ्रेशर्स पार्टी" झाली अन मग आम्ही सगळे मित्र झालो.

आमच्या विनंतीला एचओडींनी होकार देत आम्हाला एक विशेष डिपार्टमेंटला लायब्ररी कम स्टडी रुम उपलब्ध करून दिली होती. त्यात मी बसून असताना बरेचदा श्रद्धा तिच्या अभ्यासातल्या अडचणी विचारत असे.

फार सुखाचे दिवस होते ते. मी एक सुस्कारा सोडला.

आमची छोटी लायब्ररी एक प्रकारे चर्चेचे ठिकाण झाले होते. खरं तर श्रद्धाला माझी मतं कधीच पटत नसे, त्यामुळे आमची चर्चा नेहमीच भांडणाच्या सुरात चालायचे. मग विषय सापेक्षतेचा सिद्धांत असो की राजकारण.

असेच दिवस भराभर निघून गेले. माझं एमएस्सी झालं आणि त्याच कॉलेजला मी शिकवायला लागलो. माझं लेक्चर झालं की श्रद्धाचे प्रश्न तयारच असायचे. नेटची तयारी करण्यासाठी मी लायब्ररीतच बसत असे, त्यामुळे श्रद्धाची आणि माझी रोजच भेट होत असे. पण तिचं एमएस्सी झालं अन ती एक दिवस मला भेटायला आली.

"सर, उद्यापासून मी नाही येऊ नाही शकणार"

"हम्म.... अभ्यास मात्र सोडू नकोस, तू नेट सहज होऊ शकशील"

"नाही सर. घरी राहून अभ्यास करणे शक्य नाही"

"पण.. "

"सर, एक विचारू ? "

"हा विचार ना.. "

"तुम्हाला माझी आठवण येईल. "

"व्वा, का नाही येणार ? खरं सांगायचं तर तू माझी सर्वात जवळची मैत्रीण आहेस. "

"खरंच? "

"हो. का विश्वास नाही बसत ? तुझं भांडणं मी मिस करेन "

"एक सांगू ? "

"हा"

"मी मुद्दामच तुमच्याशी भांडत होती"

"म्हणजे? "

"म्हणजे एखाद्या गोष्टीचे वेगवेगळे पैलू माहिती होण्यासाठी, मी मुद्दामच तुमच्या विरुद्ध बाजूने बोलायची. त्यातून मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या, ज्या मी जन्मभर विसरू शकणार नाही. अर्थात जीवनात पुढेही तुमच्याशी असे भांडणं करायला निश्चितच आवडेल... "

ती माझी अन श्रद्धाची शेवटची भेट. त्यानंतर ती स्वतःहून कधी भेटायला आली नाही, ना मी कधी तिच्याशी संपर्क ठेवू शकलो नाही. शेवटी मला माझं करिअर बनवण्यावर जास्त लक्ष देणे आवश्यक होते. बाकी विद्यार्थी होतेच, त्यांच्याशी चर्चा करण्यात वेळ जात होताच. श्रद्धाच्या मैत्रिणी आता माझ्यासोबत अभ्यासाला बसायच्या. अन नेटच्या तयारीत मी गेट पास झालो, आणि मग गडबडच झाली. एमटेक का पीएचडी, हे कॉलेज की ते, ऍडमिशन फॉर्म, कागदपत्र, मुलाखती, सगळ्यांमध्ये २-३ महिने निघून गेले. अन मला इंदौरला ऍडमिशन मिळाली. पण "मायग्रेशन सर्टिफिकेट" तेव्हडं घ्यायचं राहिलं, त्यासाठीच आताची ही चक्कर.

आतापर्यंत माझा फुटबॉल करून मला टोलवण्याचा खेळ अचानक थांबला होता. बस एकदम जसं विमान चालावं तशी स्मुथली चालत होती. मला लक्षात आलं की आता आपण महाराष्ट्रात आलो आहे. बहुदा मुक्ताईनगर आलं असावं, असा विचार केला अन चांगली ताणून दिली.

अमरावतीत पोहचलो तेव्हा दिलीप मला घ्यायला आला होताच. थोडंसं फ्रेश होऊन मी विद्यापीठाचं काम आटोपलं, अन मंगल कार्यालयात पोहचलो.

"हे विजय सर... " दिलिपने एका गृहस्थाशी ओळख करून दिली. त्यांना खास कोल्हापुरी फेटा बांधला होता, त्यावरून ते श्रद्धाचे वडील असावेत, असा मी अंदाज बांधला.

"अरे व्वा ! तुम्ही आलात सर, मला खूप आनंद झाला. गेले २-३ वर्ष तुमच्याबद्दल श्रद्धाकडून ऐकलं होतं, आज भेट झाली".

"या सर, श्रद्धा नेहमी तुमच्याबद्दल सांगायची. तुम्ही एमटेक करत आहात हे ऐकून मला खूपच आनंद झाला. " श्रद्धाच्या आईने आम्हाला आत नेलं. त्यांचं श्रद्धा माझ्याबद्दल काय काय सांगायची, हे ऐकवणं सुरूच होतं. एखाद्या ज्युनिअरच्या घरी मी इतका माहिती असेन असं मला कधीच वाटलं नव्हतं.

थोड्याच वेळात बाकी ज्युनिअर्स आले, मग त्यांचेशी गप्पा करण्यात मी मश्गुल झालो. लग्न लागलं अन मग सुलग्न. सुलग्नाच्या वेळी श्रद्धाने "सर तुम्ही इथे या" असं म्हणत मला तिच्याशेजारी उभं करत फोटो काढायला लावला. तिला मी बरेचदा बघितलं होतं, पण ते कॉलेजमध्ये. ती मेकअप न करताच सुंदर दिसायची, आणि आता तर चक्क लग्नात, ती अगदी ऐश्वर्यापेक्षाही सुंदर दिसत होती. थोड्यावेळात आम्ही खाली उतरलो अन सरळ बफेकडे वाट केली.

"काय करतो नवरा मुलगा?" मी सहज विचारलं

"आय टी वाला आहे सर तो... " दिलिपनं माहिती पुरवली.

"हं म्हणजे दन्न कमावणारा... " दुसरा बोलला.

उगाच इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्या. जेवण संपलं अन आम्ही निघायच्या तयारीत होतो, पण दिलिपने थांबवून घेतलं. जवळजवळ सगळे मित्र-मैत्रिणी चित्रपटासाठी गेले. मला जागरणामुळे झोप यायला लागली होती.

"मला ताईकडे सोडून देशील का ? " मी दिलिपला विचारलं

"सर, जेवण व्यवस्थित झालं नं" मागून येत श्रद्धानं विचारलं.

"हो हो, अगदी छान" मी म्हटलं. खरं तर ती काय बोलतेय याकडे माझं फारसं लक्षच नव्हतं. दोन वर्षात मी श्रद्धाला कित्येकदा बघितलं असेल, मनोजने तिच्यावरून चिडवलंही होतं, पण मला तिच्याबद्दल आकर्षण असं वाटलं नव्हतं. पण याक्षणी ती इतकी सुंदर दिसत होती की ....

"सर, हे तुमच्यासाठी... " तीने गुलाबांचा एक सुंदरसा बुके मला दिला.

"हे ... ? "

"तुमच्या गेटसाठी आणि एमटेकच्या ऍडमिशनसाठी"

"थँक्यू ... " इतक्यात तिला कोणीतरी बोलावलं.

"का रे, ही इतकी सुंदर, अन हिला नवरा काळाडोमडा मिळावा, काय दुर्दैव आहे. " मी दिलिपशी इतक्या वेळ दाबून ठेवलेलं माझं मत सांगितलं.

"सर मी पण काळाच आहे नं ? " शेवटी तो श्रद्धाचा जवळचा मित्र होता, त्याला वाईट वाटले असावे.

"अरे पण तू स्मार्ट आहेस, तो कसा एकदम भदाडा वाटत आहे, अगदी लंगूर के गले मे अंगूर म्हणतात तसं झालं, वाईट वाटते यार"

"आता वाईट वाटून काय उपयोग ?"

"म्हणजे? "

"जेव्हा ती तुमच्या जवळ होती, तेव्हा तुम्हाला तो आईन्स्टाईन जास्त प्रेमाचा वाटला... तेव्हाच मनात आणलं असतं तर नवरदेवाच्या खुर्चीत तुम्ही असते"

"अरे पण मी विचार करून काय उपयोग होता, तिला पसंत पडायला नको होतो का मी ?"

"हो ! ती काय लाऊडस्पीकर घेऊन सांगणार होती तुम्हाला.... "

"म्हणजे श्रद्धा ... "

"हो, पण तुम्हाला ती समोर असतानाही फोटॉन अन बोसॉन जवळचे वाटत होते.... दुर्दैव तिचं"

"अरे पण तू हे आधी नाही सांगायचं... "

"किती वेळा सर ? किती वेळा ? "

"म्हणजे ? "

"म्हणजे काय म्हणजे ? तुमची सीनिअर, वर्षा मॅडम, मग तुमचीच बॅचमेट अनुजा मॅडम, मग श्रद्धा .... आणि नंतर .... जाऊ द्या... तिकडे त्या पोरी एकमेकींशी तुमच्यावरून भांडत होत्या, अन तुम्ही श्रॉडिंजर अन आईन्स्टाईनचं भांडण सोडवायचा प्रयत्न करत होते...."

"पण .... "

"आता काही उपयोग नाही... सगळ्यांचे लग्न झाले .... ही शेवटची... "

हे ऐकून माझं डोकं भणभणायला लागलं.

"चला आता ... एम टेकमध्ये तरी सुधरा.... " दिलीप चिडून बोलला.

ताईकडे आलो. तिने काही म्हणायच्या आतच मी म्हणालो, " जागरणानं माझं डोकं दुखतंय, मी झोपतो, मला उठवू नको. "

किती वेळ झाला होता कुणास ठाऊक, मला कोणीतरी गदागदा हालवून जागं करत होतं,

"सायली... कशाला मला उठवत आहे? झोपू दे मला .. "

"मामा, अरे सकाळचे ९ वाजले, किती झोपणार ? "

"९ ? बापरे, म्हणजे मी रात्री जेवलोसुद्धा नाही"

"नाही नं, उठ, आईनी चहा केला आहे, ब्रश कर पटकन.. मग तुला एक गंमत दाखवते, मी केलेली. "

"कसली गंमत ? "

ती माझ्यासमोर एक काचेची बाटली घेऊन आली.

"हे बघ, तू काल गुलाब आणले होते ना, मी त्याचा गुलकंद बनायला ठेवला आहे ... "

मी हताशपणे त्या प्रेमाच्या गुलकंदाकडे पाहत होतो.

गुरुवार, २२ जुलै, २०१०

मराठ्यांचा इतिहास ?

डिसेंबर १२९३ ला, ५०० मैलांवरुन आलेल्या अल्लाउद्दीन खिलजीने ८००० स्वारांनिशी देवगिरीवर हल्ला केला, त्यावेळी शंकरदेव यादव (राजपुत्र आणि सेनापती) खूप सारं सैन्य घेऊन दूर कुठेतरी गेला होता. देवगिरीवर असलेल्या ४००० स्वारांसोबत राजा रामदेवरायाने प्रतिकार केला पण तो तोकडा पडला. त्याने शेवटी तह केला.

पण हि बातमी कळताच शंकरदेव यादव परत आला तो मोठी फौज घेऊन देवगिरीच्या रक्षणासाठी आला. पण एका अफवा पसरली. दिल्लीहून फार मोठी येणार आहे. या अफवेने घाबरून राजा रामदेवराय शंकरदेवाच्या मदतीला आलाच नाही. शंकरदेवाने खिलजीच्या सैन्याला चांगलेच झोडपून काढले, पण त्याच वेळी देवगिरी किल्ल्याच्या मागे असलेली १००० स्वारांची फौज खिलजीच्या मदतीला आली. त्यांच्या घोडांच्या टापांनी इतकी धूळ उडवली की फारसं काही दिसत नव्हतं. त्यामुळे सैन्याला वाटलं की दिल्लीहून येणारी अफाट फौज म्हणजे हिच ती. आणि यादव सेना घाबरून पळायला लागली. ६ फेब्रु. १२९४...

खंडणी दिली गेली... किती ? ६०० मण सोनं, ७०० मण मोती, २ मण हिरे-माणकं आणि १००० मण चांदी, ..... आणि रामदेवरायाची मुलगी.... (संदर्भ :- बाबासाहेब पुरंदरे.... )

मराठी सेना हरली ती कशामुळे ? केवळ एका अफवेमुळे, की रामदेवरायाच्या अनाठायी भीतीने? की आक्रमणाला सज्जच नसलेल्या रामदेवरायाच्या अदूरदर्शीपणामुळे ? की मराठी माणसं त्यावेळच्या संतांनी दाखवलेल्या भक्ती-मार्गाला लागल्यामुळे ?

तेव्हापासून जो दिल्लीचा दरारा बसला, तो छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे वगळता तो आजतागायत कायम आहे, हे आपलं दुर्दैव का आपल्या कर्माची फळं.....

ह्या आक्रमणापूर्वी असलेल्या संपन्न महाराष्ट्राचा इतिहास अगदीच थोडक्यात शिकवला जातो.... आता तर "कोथळा"ही पुस्तकातून काढून टाकलाय. मराठी माणूस पेंढा भरून ठेवलेला वाघ झालाय का ?

का म्हणून आम्हाला आमचा वैभवशाली इतिहास शिकवला जात नाही ? फक्त देशमुख-देशपांडे आणि त्यांच्या वतनदारी.... आणि थोडक्यात छत्रपतींचा इतिहास... बस्स ? आम्हाला मुळातूनच अस्मितारहित करण्याचे कारस्थान खिलजीपासून आजपर्यंत चालूच आहे का ?

स्वातंत्र्यपूर्व काळातही इतिहास गांधीजी आणि नेहरू यांच्याच भोवती फिरतो. त्यावेळी महाराष्ट्रात कोणी नेतेच नव्हते? इथे स्वातंत्र्यचळवळ झालीच नाही ? मग तिचा इतिहास कुठे गेला ? का आम्ही लाचारच राहावं म्हणून तोही झाकला जातो ?

हत्तीच्या पिल्लाला बांधण्यासाठी जाडजूड दोरखंड बांधले जातात, मात्र मोठ्या हत्तींना साधी साखळीही पुरते, कारण त्याची प्रतिकार करण्याची इच्छाच मरून गेली असते.... असाच मराठी माणूस झालाय का ?

ज्या छत्रपतींनी शाहिस्तेखानाची (ज्याची फौज १ लाख होती) बोटे छाटली, त्यांच्याविषयी भलतंसलतं लिहिणाऱ्या लेखकाच्या पुस्तकावर भारतात बंदी घलू शकत नाही.... त्याची बोटे धजलिच कशी असं काही लिहायला.... का आम्हीच सुर्याजीचे वंशज निर्माण करून स्वतःलाच मातीत घालतोय ...... कशासाठी ... कशासाठी ?

शुक्रवार, १६ जुलै, २०१०

सुपारी

"काय रे, खूप उडायला लागलास तू ? "

"कोण बोलतंय ? "

"तुझा बाप.... xxxx .. ओळखलं नाही का ? "

"अं... नाही. "
"मी बंड्यादादा बोलतोय.... चल हप्ता पोचव पटकन नाहीतर ... "

"नाहीतर .......... "

"नाहीतर तुला पोचवीन... हि हि हि ... "

*************************

"का रे .... तू मला काय येडा समजलास काय ? "

"......... "

"तू पोलिसांकडे कंप्लेंट केली ते मला समजत नाय काय ? अबे भुक्कड.. जगायचं असेल तर ५०,००० पोचव ..... नाहीतर तुझा तेरावा घालीन मी.... समजला काय ? बंड्यादादा म्हणतात मला"

************************************

"हॅलो"

"बंड्या को देना"

"बोल रहा हूं ... तू कौन है बे ? "

"तुला पैसा पायजे का माझं नाव ? "

"काम बोल"

"टपकाना है"

"किसको ?"

"डॉ. घोटकर"

"क्यू ? "

"तेरेको क्या लेना देना ... तू पैसे ले और ... "

"ऐ, वो अपून को ५०,००० का हप्ता देगा... "

"मी तुला १० लाख देतो ... बोल ? "

"पण ... कोंबडी खतम करून ... "

"पाहिजे का ठेवू ? "

"ऍडव्हान्स ? "

"ठीक आहे पण ५०,००० चं देणार.. बाकी काम झाल्यावर... "

"पण ... "

"पाहिजे का ........?"

"बरं... "

"अजून एक ... "

"आता काय ?"

"त्याच्या अंगावरच सोनं काढायचं आणि चाकूने त्याला खतम करायचं"

"पण .... "

"जसं सांगितलं तसच करायचं .... काय समजलास ... घोडा नाही वापरायचा.... "

"ठीक आहे, आपल्याला काय ...... पण ऍडव्हान्स"

"ठीक आहे. आज रात्री ११ वाजता ..... "

**********************************

"हॅलो, वाळकेश्वर पोलिस चौकी"

"हॅलो, मी डॉक्टर घोटकर बोलतोय ... "

"आता काय आहे ... अरे रात्रीसुद्धा त्रास देता हो ... तुमची कंप्लेंट घेतली होती ना लिहून ..."

"अहो माझ्या हातून खून झालाय .... "

"काय ? कुणाचा ? "

"ते माहिती नाही... पण कोणीतरी चोर असावा ... "

**********************************

"स्वतःचा बचाव करण्यासाठीच डॉ. घोटकरांनी गोळी चालवली, हे सिद्ध झाले आहे. पोलिसांनी त्यावर विश्वास ठेवून लगेच अँब्युलंस पाठवली असती तर कदाचित मयत बंड्या वाचला असता. त्यामुळे डॉ. घोटकरांना निर्दोष सोडण्यात येत आहे.......... "

***********************************

"चला सुटलो एकदाचा.... महिना ५०,००० पेक्षा एकदाचे ५०,००० परवडले .... "

बुधवार, १४ जुलै, २०१०

ताण ...

"विनू अरे उन्हाळ्यात पुन्हा लावू ना केबल"

"आई प्लीज, अग मी फक्त डिस्कवरीच बघतो"

"हो, पण आता तुझा अभ्यास वाढला की नाही ? "

"पण म्हणून डिस्कवरी नाही बघायचं, टेबल-टेनिस नाही खेळायचं, मासिकं नाही वाचायची"

"असा रे काय करतोस ? मागच्या वर्षी तो ऋषी फक्त २ मार्कांनी मागे होता तुझ्या. "

"असू दे"

"असू दे काय ? पहिला नंबर गमवायचा आहे का ? "

".... "

"चल हे दूध घे अन जा ट्युशनला"

"शाळा, ट्युशन, क्लासेस, .... मला कंटाळा आला आहे... "

"काय रे कशाचा कंटाळा आला आहे? "

"बाबा, तुम्ही तरी सांगा ना आईला, प्लीज"

"तुझ्या डिस्कवरीचं ना ? "

"हो"

"मीच बंद केलंय कनेक्शन"

"पण मग मला काही करमणूकच नाही"

"शाळा सुरू असताना कशाला हवी करमणूक? मी ८ वीत असताना .... "

"बस झालं तुमचं पुराण"

"पुराण ? म्हणजे माझी मेहनत तुला फालतू वाटते ? अरे कधी पहिला नंबर सोडला नव्हता मी, म्हणून आज इतका यशस्वी आहे मी. आज हा पैसा दिसतोय ना ती माझी मेहनत आहे, तुझ्यासारखा टीव्ही पाहत अन टेनिस खेळत बसत नव्हतो मी"

"पैसा काय चाटायचा आहे ? "

"विन्या ....... खूप बोललास.... तुझी जीभ जरा जास्तच चालायला लागलीय. "

"हो ? मग हासडून टाका एकदाची"

"विन्या......."

"अहो, प्लीज मारू नका त्याला"

"तूच त्याला शेफारून ठेवलंय"

"तू जा रे ट्युशनला"

"जातो... पण मला डिस्कवरी नाही मिळालं तर .. "

"आता बघतोच मी कसा बघतो तू टीव्ही ते... "

******************************************************

"अहो... "

"उं... "

"अहो उठा ना ... चार वाजले.. "

"ए तू मूर्ख आहेस का ? चार वाजता मला काय उठवतेस ? मला नाही तुझ्या लाडक्या लेकाला अभ्यास करायचा आहे, त्याला उठव. मला झोपू दे"

"अहो म्हणूनच उठवतेय"

"काय कटकट आहे, काय झालं?"

"अहो तो दार उघडत नाही आहे. "

"हा नं जरा जास्तच करायला लागला आहे. मी बघतो असा कसा उठत नाही ते... "

"ए विन्या, ऊठ... दार उघड... "

"विनू दार उघड रे ... "

"विन्या ........ आता उठतोस की दार तोडू मी ? "

"अहो... ही किल्ली... "

"हं .......... आतून चिटकणी लावलीय लेकानं, थांब जरा, मी धक्का दिला की लगेच उघडेल बघ... "

"विन्या ........ ए ऊठ ... तोंडावर पाणी मार त्याच्या... "

"अहो, हा उठत का नाहीय ? विनू... ए बाळा, अरे ऊठ ना...."

"अहो काय झालं"

"नाडी चालू आहे, पण ... "

"अहो जरा खालच्या मजल्यावरच्या डॉ. शिंदेंना बोलावता का ? "

***************************************************************

"डॉ. शिंदे, मी शरद जाधव, ३०२ मधून बोलतोय.... हो ... माझा मुलगा .... अहो तो उठतच नाहीय हो ... हा प्लीज ... नाही अँब्युलन्स कशाला, माझ्याकडे गाडी आहे... तुम्ही येता का प्लीज ... "

****************************************************************

"डॉक्टर ... "

"काळजी करू नका ... पण झोपेच्या गोळ्या त्याच्या हाती कश्या लागल्या ? "

"माहिती नाही हो ... "

"मुलांवर जबरदस्ती कशाला करताय मि. जाधव ? ताणायचं किती याला काही मर्यादा ? "

"हो पण... आजकालच्या काँपिटिशन ... "

"पण मुलगाच नाही राहिला तर कसली काँपिटिशन अन कसलं काय ? "

"आय ऍम सॉरी डॉक्टर... "

"सॉरी मला नाही, त्याला म्हणा .... आणि मला वाटते, तुमचा मुलगा अभ्यासात कमी पडत नाही तर मग कशाला त्याचा आनंद हिरावून घेताय ? बाकी तुम्ही समजदार आहात .."

"हो ... आम्ही त्याला भेटू शकतो.. "

"हो पण .... त्याला झोपू द्या... उठवू नका "

*******************************************************************

"अरे विनय, ये ये .... काय म्हणतोस ? कसं वाटतंय आता ? "

"एकदम छान... काका तुम्ही होतात म्हणून वाचलो मी ... "

"अरे काहीतरीच काय ? बाबा काय म्हणतात ? डीस्कवरी सुरू झालं का ?"

" हो आणि टेबल टेनिससुद्धा ... आता ते रागवत नाही... पण तुम्हाला केलेलं प्रॉमिस मी पाळणार हा ... पहिला नंबर नाही सोडणार ... "

"शाब्बास !!! "

"आणि काका, एक स्पेशल थँक्यू ... "

"आता हे कशाबद्दल ? "

"त्या जायफळासाठी ... "

शनिवार, १० जुलै, २०१०

भलत्या वेळी

प्रत्येक माणसाला (विशेषतः पुरुषाला) हव्या त्या गोष्टी मिळतात, फक्त त्याची वेळ चुकलेली असते. त्याचे कारण म्हणजे स्त्रीहट्ट असावा. (स्त्री = आई किंवा बायको).

लहानपणी सर्वात प्रिय गोष्टींपैकी दोन म्हणजे खेळ आणि झोप. पण आई नामक प्राण्यामुळे झोपेचे खोबरे आणि खेळाचे पानिपत व्हायला वेळ लागत नाही. जेव्हा बाळ १-२ वर्षाचं असतं तेव्हा त्याला खेळावंस वाटतं, पण आई त्याला "झोप रे आता" म्हणत जबरदस्तीने झोपवते. खायचे नसेल तर जबरदस्तीने खाऊ घालते.

हेच बाळ जेव्हा शाळेत जाऊ लागते, तेव्हा त्याच्या सकाळच्या झोपेत व्यत्यय आणत, "अरे ऊठ रे आता... शाळेची वेळ झाली ...." अश्या प्रेमळ सूचनांपासून "आता उठतोस की येऊ मी " अश्या धमक्या देत उठवते. खेळायला जायच्यावेळी "आधी खवून घे" चा धोशा चालू असतो. आणि परत आल्यावर प्रचंड भूक लागली असताना " संध्याकाळच्यावेळी जेवू नये, थांब जरा" म्हणत ताटकळत ठेवते. जेवण होताच झोप येऊ लागते, पण "होमवर्क कोण करणार... " म्हणत अभ्यास घेते.

उन्हाळ्यात आंबे खायची वेगळीच मजा असते, असं फक्त पुस्तकातच वाचायचं असते. कारण "बस कर रे आता, एक खाल्ला नं, आता उद्या" असं म्हणत तेही सुख मिळू देत नाही.

जेव्हा हेच बाळासाहेब कॉलेजात जातात, परगावी राहतात आणि सुट्टीत अभ्यास घेऊनच घरी येतात, तेव्हा नको असताना, "किती वाळलास म्हणत वर्षभराचं खाण्याचं सामान १५ दिवसात संपवण्याचा सपाटा लावते. उन्हाळ्याच्या सुटीत डॉक्टरकडे जायची वेळ येईपर्यंत आंब्याचा रस खाऊ घालते. रात्री अभ्यास करावा की हि आलीच. "राहू दे रे अभ्यास, तो काही पळून नाही चालला" म्हणत झोपायचा आग्रह करते. आणि सकाळीसुद्धा उठवत नाही.

लग्नानंतरतरी आपल्या मनासारखं वागता येईल तर शपथ. कारण त्यावेळी मातोश्रीच्या रूपातच बायको नामक प्राणी गळ्यात बांधला असतो. मधुचंद्राला गेल्यावर सकाळी भूक लागली म्हणून ब्रेकफास्टसाठी उठावं तर, " ए, काय हे, झोप न थोड्यावेळ" म्हणत ती ओढून घेते, पण तिकडून परत आल्यावर घरी जरा झोपावं म्हटलं तर, " अहो आवरा, ७:४० ची सुटेल" पासून "आता उठताय की पाणी आणू " अश्या धमक्या सुरू होतात. सकाळी ब्रेकफास्ट नको म्हणत असताना कोंबला जातो. दोन पोळ्यांची भूक असली तरी ४-५ पोळ्या, वरण, भात, भाजी (झक्कास तर्रीवाली), चटण्या, आणि हे कमी झालं म्हणून संत्री/ मोसंबी वगैरे फोडी करून डब्यात दाबून भरलेली असतात. असं वाटते की सालं हॉस्टेलला असतानाच लग्न केलं असतं तर पोटाचा प्रश्न सुटला असता. पण हे सगळं वर्ष दोन वर्ष. तेव्हड्यात वजन आणि पोट चांगलंच वाढलेलं असतं.

मुलं झाली की, "डबा भरून घ्या आणि चिंटूचाही डबा भरा. आधी त्याला सोडा मगच ७:४० पकडा." स्वतः उठा आणि चिंट्यालाही उठवा. म्हणजे दुसरंही पाप करा, पोराला झोपू न देण्याचं. रवीवारीसुद्धा जॉगिंग टळत नाही आणि पोट (वाढलेलं) कमी होत नाही. वाढत्या वजनाला जास्त जेवण हवं असतं. एव्हाना चमचमीत खाण्याची सवयही झाली असती, पण तिच्या माहेरचा कोणी डॉक्टर सांगतो अन चमचमीत पदार्थांच्या जागी कारली, दुधी भोपळा, कच्ची भाजी, गाजर वगैरे कंदमूळं खाण्याची पाळी येते.

स्वतःचं वजन सांभाळत नसताना, "जरा चिंट्यासोबत खेळा हो" असं म्हणत वजन कमी करण्यासाठी बॅटमिंटन वगैरे प्रयोग केल्या जातात. लहाणपणी बॅटमिंटनची फुलं परवडत नाही म्हणून वर्षानुवर्षे त्या बॅटस खिळ्यावर आणि मग माळ्यावर पडलेल्या असतात, त्या निघतात त्या अश्या.

पन्नाशीनंतर बऱ्याच गरजा आणि काळज्या कमी होतात. वयोमानानुसार झोपही कमी होते. आता जरा योगासनं वगैरे करून तब्येत ठाकठीक करावी म्हटलं की , " आयुष्यात जरा कधी शांतपणे झोपू द्याल का ? " असं म्हणत सौ. त्याला मोडता घालणारच. पण पुढे ५-१० वर्षात म्हणणार, "सकाळी उठत जा आता, योगासनं करा, फिरायला जा.... आता रिटायर्ड झाल्यापासून नुस्ते घरात बसून असता ...." सुनबाईने काही चांगले पदार्थ केले की, " त्यांना सहन होत नाही, त्यांना नको देऊस" म्हणत उपासमार केली जाते.

ऐनकेन प्रकारेण आमची वाट लावण्याचा वसा त्यांनी सासुबाईंकडून घेतला असतो, तो काही टाकत नाही ....

थोडक्यात सगळ्या गोष्टी मिळतात पण नको तेव्हा आणि जेव्हा हव्या तेव्हा ह्या दोघींपैकी कोणीतरी एक मिळू देत नाही... काय करणार आम्ही पडलो पुरुष बिच्चारे !

गुरुवार, २४ जून, २०१०

सोनल

लग्नानंतर बायकोशी नेमकं कोणत्या विषयावर बोलावं हे माझ्यासारख्या मुलींशी फटकून राहणाऱ्याला काय कळणार? मी उगाच तिच्याशी काहीतरी बोलायचं म्हणून बोलत होतो (खरं तर ऐकत होतो). आम्ही आमच्या रूमसमोरच्या मोकळ्या जागेत गप्पा मारत होतो. उन्हाळा असल्याने लाइट नव्हते, मग करणार तरी काय? त्यात ते ब्रेली, म्हणजे लाइट कधी येईल माहिती नाही.
अचानक तिने प्रश्न केला.
"तुम्ही मुंबईत असताना काय करत होतात? "
"म्हणजे ? " मला प्रश्नाचा रोख कळला नव्हता.
"म्हणजे शनिवारी, रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी... "
"अच्छा ! ते होय. हम्म... मी बरेचदा सोनलकडे जायचो. म्हणजे महिन्यातून दोनदातरी चक्कर व्हायची. नेरुळपासून १० मिनिटांवर सोनलचा फ्लॅट होता. मग आम्ही मिळून स्वयंपाक करायचो किंवा बाहेरच जेवायला जायचो. "
"सोनलची अन तुमची चांगलीच मैत्री आहे, नाही ? "
"मग काय ! अगदी लहानपणापासून. ४थी पर्यंत एकाच शाळेत होतो, नंतर वेगळ्या शाळा झाल्यातरी मैत्री कमी नाही झाली. "
"वॉव ! तुम्ही नाटकाला वगैरे जात होते? "
"हो, वाशीला एक नवीन नाट्यगृह सुरू झालं होतं. तिथं आम्ही "राशीरंजन" बघितलं होतं. पण मरीन ड्राइव्ह फिरण्याची वेगळीच मजा राहायची. सोनल म्हणजे मुंबईत एक्स्पर्ट... दादरपासून सिएसटी/चर्चगेटपर्यंत बऱ्याच गोष्टी माहिती. मला काहीही खरेदी करायची असली की मी लगेच सोनलला फोन करून विचारायचो.
"तुम्ही त्यांच्या फ्लॅटवर गेल्यावर काय-काय करायचे ? "
"अं ... बरेचदा जवळच फिरायला जाणे, किंवा नाटक, वगैरे... आणि रात्री इंडियन आयडॉल... मी पहिल्यांदा इंडियन आयडॉल सोनलकडेच बघितलं"
"हो? "
"हो नं.... पण तोच त्याचा शेवटचा एपिसोड होता".
"मग ? "
"मग एच.बी.ओ. किंवा स्टार मुव्हिजचे पिक्चर्स... "
"इंग्रजी? "
"हो. मग काय ! आम्हाला दोघांनाही खूप आवडतात इंग्रजी पिक्चर्स... रात्री उशीरापर्यंत पिक्चर्स बघायचो... काय मस्त दिवस होते ते... "
"त्यांचा फ्लॅट किती मोठा आहे ? "
"अं. .. २ बेडरूम आणि हॉल किचन... मस्त फ्लॅट आहे.... "
"मग तुम्ही बेडरूममध्येच झोपत होते ? "
"नाही गं.... हॉलमध्येच .. "
"दोघही ? "
"हो, .... " मला कळेचना हि असं काय विचारतेय. बरं अंधारात तिच्या चेहऱ्यावरचे हावभावही कळत नव्हते... मला वाटलं की ती माझी मजा घेतेय.
"जा ... तुम्ही मला फसवलं" मला मुसमुसण्याचा आवाज आला.
"म्हणजे ........ ? " मी चक्रावलो होतो.
"तुम्ही दर शनिवारी सोनलच्या फ्लॅटवर जात होते... एकत्र जेवण, नाटक, इंग्रजी सिनेमे, अन मग .... " आत्ता माझी ट्यूब पेटली.
"ए बाई, अगं सोनल माझा मित्र आहे... "
"काय ? आता काही सांगू नका .... सोनल नावाची मैत्रिण आहे तुमची .. आणि ... "
"आता कसं समजावू तुला ? "
"इतकंच असेल तर फोन लावून द्या मला ... "
"मला त्याचा नवीन नंबर माहिती नाही. "
"काही नाही हि सगळी नाटकं आहेत"
"तुला विश्वास नसेल तर माझ्या आईला विचार. सोनलचं घर अन माझं घर अगदी जवळ आहे, ती सांगेल तुला. "
"काही नको.... " मग मोठ्यानं रडणं....
********************************************
२-३ दिवस असेच गेले. मी सुद्धा काय करावं या विचारात होते... मग एक दिवस संध्याकाळी ती म्हणाली,
"खरंच सोनल तुमच्या मित्राचं नाव आहे ? "
"अग हो, खरंच.. "
"सॉरी बरं, कारण सोनल माझ्या एका मैत्रिणीच नाव आहे .. त्यामुळे मी ... "
मी डोक्यावर हात मारून घेतला.
****************************************************************
आजही कधी सोनलचा विषय निघाला की मी मोठ्याने हसतो, तर ती धमकी देते, "मला एकदा बघितल्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाही की सोनल तुमच्या मित्र आहे, मैत्रीण नाही".
अर्थातच हि गोष्ट सोनलला माहिती नाही, नाहीतर .......

बुधवार, ९ जून, २०१०

भ्रमिष्टपणा

म्हातारपणा तसा वाईटच. त्यात भ्रमिष्टपणा आला तर अधिकच वाईट. पण कधीकधी अश्या गोष्टी मजेदार वाटू लागतात, अर्थात, जोपर्यंत आपण स्वतः त्या व्यक्तीच्या संपर्कात नसतो, तोपर्यंतच.

मी अमरावतीला असताना माझ्या खोलीजवळच्या एका आजोबांची गोष्ट. पहिल्यांदा त्यांना भेटलो तेव्हा मला फारच विचित्र वाटलं होतं. मी कॉलेजच्या गडबडीत होतो, अन त्यांनी बोलावलं.

"ये बाळ"

"मी २५ चा बाळ ? " मी मनात. असो.

"तुझ्या बाबाला ओळखतो मी". बाबा बरेच वर्ष अमरावतीला होते, तेव्हा हे शक्य होतं. मला आनंद झाला.

"हो ? कसं काय? "

"ते जाऊ दे पण त्याच्याकडून मी एकदा २ आणे उधार घेतले होते. ते त्याला देशील? "

"अहो पण आजोबा २ आण्याचं काय. "

"नाही, हिशोब म्हणजे हिशोब, घे... " असं म्हणत त्यांनी मला चार आणे दिले.

१~२ दिवसातच जेव्हा "भ्रमिष्टपणा कळला तेव्हा वाईट वाटलं. ते कोणीही रस्त्यावरून जाणारा असला की त्याला बोलावून २५ पैसे द्यायचे

मला दर ३-४ दिवसाआड ते बोलवायचे, अन कधी रिक्षावाला, तर कधी धोबी, कधी भाजीवाला... असं म्हणत चार आणे द्यायचे. पण मी संध्याकाळी जाऊन ते पैसे घेऊन यायचो आणि त्यांच्याच नातीला कधी बिस्किट, गोळ्या घेऊन द्यायचो. मग काय ? अहो हिशोब म्हणजे हिशोब.

दुसरा किस्सा माझ्या दूरच आजीचा.

त्या आजीला भेटलो ते तिच्या नातीच्या लग्नात. लग्नानंतर नात आणि जावई आलेले होते. सगळे जेवायला बसले, तशी आजीही बसली. ५ मिनिट झाले, अन आजी काहीतरी पुटपुटली. माझ्या आईने त्यांना भाजी वाढली, तर एकदम घाबरली आणि म्हणाली, " अई बाई, आता काय करू मी. हिनं मला दुसऱ्यांदा भाजी वाढली. आता कसं करू ? मी तर एकदाच भाजी खात असते. आता भाजी वाया जाईल. " पुढचे १५ मिनिट आजीचं तेच चालू होतं. आई अगदी घाबरून गेली, पण आजीच्या सुनेने समजावलं की त्या अश्याच करतात. अगदी पहिल्यांदा भाजी वाढली तरी सुद्धा. त्यांना विसर पडतो की आपण काही खाल्लेलं नाही.

तिसरे एक आजोबा, कोणीही त्यांच्या घरी आला, की सुनेवर ओरडायचे, " सूनबाई, मला भूक लागली गं. मला जेवायला दे गं बाई". समोरच्या व्यक्तीला वाटावं की सून सासऱ्याला छळते. पण ते आजोबा आपण जेवलो हेच विसरून जायचे. मग सून त्यांना दिवसातून ७~८ वेळा जेवू घालायची. आणि पहिल्यांदाच वाढताना विचारायची, " अजून पोळी वाढू का? "

लोकांनी माझे असेच किस्से सांगू नये, हिच देवाचरणी प्रार्थना

सोमवार, २४ मे, २०१०

तुम्ही कुठले ?

"Where are you from?"
नेहमीचा प्रश्न. पण उत्तर बदलतय.
पुर्वी मी अमरावतीला असताना ’घाटंजी’ सांगायचो. 
नंतर इंदौरला, बरेली-मेरठ (मिरत)ला असतांना ’महाराष्ट्र’ तर मुंबईत असताना ’यवतमाळ जिल्हा’. 
अन आता "India".
माणसाची ओळख कशी बदलत जाते. 
अमरावतीला एम.एस.सी.च्या गृपमध्ये वणीवाले मित्र जवळचे वाटायचे, काय तर ते माझ्या जिल्ह्यातले म्हणून. अन आता....

देशाच्या कुठल्यातरी कोपऱ्यावरचा, तर कधीकधी पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश इथले लोक सुद्धा जवळचे वाटतात. शेवटी काय, माणुस इथुन तिथुन सारखाच, देशाच्या, राज्याच्या सीमा त्याला वेगळे करतात इतकच.

बुधवार, ५ मे, २०१०

141075

खर तर रामदासला देशपांडे सरांना तिसऱ्यांदा डिस्टर्ब करायची अजिबात इच्छा नव्हती. पण त्यांच्या मिसेसने अर्जंट म्हटल्यावर त्याचाही नाइलाज झाला. त्याने भीतभीतच दरवाज्यावर टकटक केली. क्लास चालू असताना देशपांडे सरांना कोणीही डिस्टर्ब केलेल अजिबात आवडत नसे. आता तिसऱ्यांदा कोणीतरी ....... त्यांच्या कपाळावर आठया पडल्या. नाराजीनेच त्यांनी दरवाजा उघडला. रामदासला पाहुन ते भडकलेच.


"तुला दुसरी काम नाहीत का? आता काय आहे?"

सर, मॅडमचा फोन आहे."

"सांग तिला नंतर कर म्हणून...." ते दरवाजा लोटत म्हणाले.

"सर त्यांना काहीतरी अर्जंट बोलायचे आहे."

"हं........... ठिक आहे" निराश हो‍उन त्यांनी वर्ग सोडला. विद्यार्थ्यांच्याही चेहऱ्यावर निराशा झळकत होती.

"ही रुची म्हणजे नं...." चरफडतच ते ऑफिसमधे आले अन फोन उचलला.

"हॅलो, मी रमेश, काय झालं?"

"अहो.... मी...." पलिकडून एक रडका आवाज आला.

"रुची, काय झालं? अगं सांगशील तर...." देशपांडे सरांनी थोडं समजुतदारपणे विचारलं.

"रमेश, अहो मी इकडे बायपासला आहे....." रुचीच्या आवाजातला रडकेपणा कमी झाला होता.

"बायपासला? तिकडे काय करतेय?" रमेशचा राग अद्याप गेला नव्हता.

"अहो मी प्रॅक्टीससाठी इकडे जुन्या बायपासला आली होती." ती कशीबशी बोलली.

घाबरटपणा आणि आत्मविश्वासाचा अभाव या दोन गोष्टी सोडल्या तर रुची एक उत्कृष्ट पत्नी होती. लग्नाला आठ वर्ष झालीत पण तीनं रमेशशी भांडण तर सोडाच, त्याची साधी तक्रारही कोणाकडे केली नव्हती. अर्थात रमेशही तीला जीवापाड जपायचा. तसा तो मुळचाच श्रीमंत आणि आता प्राध्यापक. मोठ्या हौसेने त्याने तिच्या वाढदिवसाला तीला फोर व्हीलर भेट दिली. गाडीचा नंबर खास निवडुन आणला होता. एम. एच. १४ आर १०७५, ते तिची जन्मतारीख १४.१०.७५ यावरुन. मात्र रुचीला वर्षभर जमेल तशी प्रॅक्टिस करुनही गाडी चालवण्याचा आत्मविश्वास काही येत नव्हता. गर्दीत किंवा शहरात तर सोडाच, मोकळ्या रस्त्यावरही तीला थोडी भितीच वाटायची. त्यामुळे ती कधी, कुठे, कशी गाडी फसवेल काही सांगता येत नव्हतं. आणि अर्थातच असा काही प्रॉब्लेम आला की ती लगेच रमेशला कॉल करुन बोलवायची.

आजही तेच. खरं तर रमेशने आज त्याचा आवडता टॉपिक सुरू केला होता. मुद्दाम सकाळचे दोन लेक्चर्स सलग घ्यायचे ठरवलं होतं, पण........

नुकताच, काही दिवसांपुर्वी शहराबाहेरुन जाणारा नविन बायपास झाला होता म्हणून रमेशनेच तीला जुन्या बायपासला प्रॅक्टिस करायचा सल्ला दिला होता. तिथेच काहीतरी गडबड झाली असणार हे त्याच्या लक्षात आलं. स्वतःला कंट्रोल करत तो म्हणाला,

"रुची...... काय झालं? तू जरा मला व्यवस्थित सांगते का?"

"अहो, मला काही सुचतच नाही हो" ती अधिकच रडवेली झाली.

"रुची प्लीज, .... जस्ट रिलॅक्स...... आणि रडू नकोस.., प्लीज" एव्हाना ऑफिसमधले सगळे लोक आपापल्या कामाला लागले होते. त्यांच्यासाठी हे नेहमीचच होतं.

"काय झालं? तू दुसऱ्या गाडीला धडक मारली?"

"न नाही.."

"गाडी चिखलात फसलीय?"

"नाही..."

"मग? ट्रॅफिक पोलिसने अडवली?"

"नाही...."

"अगं मग झालं तरी काय?" रमेशने थोडसं वैतागुन विचारलं.

"अहो, गाडीसमोर एक माणुस........" ती कशीबशी बोलली.

"व्हॉट? तू त्या माणसाला उडवलस ?" तो जवळजवळ ओरडला, तसे ऑफिसमधले लोक त्याच्याकडे बघु लागले.

"अहो नाही......... मी नाही" तीला रडू आवरेनासं झालं.

"तू नाही उडवलस तर तो माणुस काय स्वतःच तुझ्या गाडीवर येउन पडला की काय?" रमेश तिच्या रडण्याने वैतागला होता.

"हो......." ती फोनवरच हमसाहमशी रडू लागली.

"रुची, तू रडणं बंद करते की मी फोन ठेवू?" तो चिडुन ओरडला. ती मात्रा लगेच लागू पडली. रुचीने रडणे बंद केले.

"आता सांग काय झालं?"

"अहो, मी ३० च्याच स्पीडने जात होते. सन्मती कॉलनीच्या चौकाजवळ एक माणुस समोरुन धावत आला. मी ब्रेक मारला, गाडी थांबवली, तसा तो गाडीवर येऊन पडला. त्याला खुप लागलयं वाटते. त्याच्या मागे तीन चार लोक तलवारी घेउन येत होते. तो गाडीवर येउन पडला तसे ते पळून गेले."

"तो जिवंत आहे का?" रमेशने काळजीने विचारले.

"माहीती नाही"

"अगं मग बघ ना..........." तो पुन्हा ओरडला.

तिकडून दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि पाठोपाठ स्स असा उद्‌गारही ऎकला.

"अहो..."

"हं, काय झालं?"

"तो रक्ताने माखलाय."

"पण तो जिवंत आहे का?"

"बहुतेक......."

रमेशला शेजारच्या भिंतीवर डोकं आपटून घ्यावसं वाटलं. इतकी घाबरट बायको आपल्याच नशिबी असल्याबद्दल त्याने स्वतःच्याच नशिबाला शिव्या घातल्या. पण तो लगेच सावरला. त्या माणसाच्या जीवन-मरणाचा प्रश्न होता, अर्थात तो जिवंत असेल तर.........

"रुची, मी काय सांगतो ते व्यवस्थित ऎक."

"हं"

"त्याला उचल आणि गाडीत टाक."

"मी?"

"हो... शेजारी कोणी असेल तर त्याची मदत घे........"

"इथे कोणीच नाही."

"रुची, हा एका माणसाच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे"

"पण मी त्याला कसं उचलू? त्याचं रक्त...."

"जस्ट फर्गेट एव्हरीथिंग... विचार कर, तो माणुस मी आहे, मी, तुझा नवरा......"

"रमेश........" ती जवळजवळ ओरडलीच.

"जवळच संजीवन हॉस्पिटल आहे, तिथे त्याला घेउन जा. मी येतोच."

"पण ........."

"लक्षात ठेव रुची, त्याला काही झालं नं तर मी जन्मभर तुझ्याशी बोलणार नाही" रमेशने रागातच फोन आपटला. तो अगदी सुन्न झाला होता.

"सर .......... जायच का?" रामदासने विचारले.

रुची त्या माणसाला हॉस्पिटलला व्यवस्थित पोहचवेल की नाही याची त्याला शंकाच होती. एक तर तिला गाडी चालवायची भिती वाटायची, त्यात रक्ताने माखलेला माणुस म्हणजे........

"सर......" रामदासने पुन्हा एकदा हाक मारली.

"अं........" तो तंद्रीतुन जागा झाला.

"चलायचं.........?" रमेशला त्यावेळी रामदासचं कौतुक वाटलं. लगेच ते दोघही हॉस्पिटलला निघाले. रमेशने त्याला मुद्दाम जुन्या बायपासवरुन घ्यायला सांगितलं. सन्मती कॉलनीच्या चौकाजवळ थोडसं रक्त सांडलेलं दिसलं, पण १४१०७५ दिसली नाही तसा तो थोडा निर्धास्त झाला. याचा अर्थ रुचीनं त्याला हॉस्पिटलला नेलं होतं.

पुढच्या १० मिनिटात ते दोघ हॉस्पिटलला आले. सकाळची वेळ असल्यामुळे पार्किंग प्लेस अगदीच मोकळी होती. पण तिथे त्याला त्याची गाडी दिसली नाही. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ’रुची गेली कुठे’ हा विचार करतच तो रिसेप्शनला आला.

"आत्ता इथे एका माणसाला अडमिट केलय का?"

"नाव काय?" रिसेप्शनिस्टने थंड चेहऱ्याने विचारले.

"नाही, मला नाव माहीती नाही, पण पंधरा-वीस मिनिटांपुर्वी ..........."रमेशने निराशेने विचारले.

"हे बघा इथे रोजच कोणीना कोणी अडमिट होतं. नाव सांगीतल्याशिवाय कसं कळणार?"

रुची तिथेच आली होती याची त्याला खात्री नव्हती, तरी शेवटचा प्रयत्न म्हणुन तो म्हणाला,

"त्याच्या शरीरावर तलवारीचे घाव..........."

"तो का?" मध्येच एका नर्सने तोंड खुपसले.

"हं ... तो कुठाय?"

रमेश त्या नर्सने दाखवलेल्या दिशेकडे धावतच सुटला. शेवटच्या खोलीजवळ रुची उभी होती. तिची पिवळी साडी रक्ताने लाल झाली होती. शेजारच्या बाकड्यावर एक हवालदार तंबाखू मळत बसला होता.

"तो कुठाय?" रमेशने उत्सुकतेने विचारलं

"..........." ती एकदम रडू लागली.

"म्हणजे तू ..... तू ..... त्याला........"

"नाही हो........"

"मग कुठाय तो?"

"ऑपरेशन थिएटर..." ती कशीबशी म्हणाली.

"हं....... पण मग गाडी कुठे आहे?" त्याने संशयाने विचारलं.

तीने शेजारच्या खिडकीतुन गाडीची अवस्था दाखवली. समोरचा भाग कोपऱ्यावर धडकला होता, पण फारस नुकसान झालं नव्हतं.

"घाईघाईत ब्रेक लागलाच नाही....." तीचं रडणं चालुच होतं.

"हं" तो निश्वास टाकत म्हणाला. पण तिचं मुसमुसणं चालुच होतं.

"अगं पण तू आता का रडते आहेस?"

".................."

"गाडीचं नुकसान झालं, म्हणुन?"

तीने मानेनेच नकार दिला.

"मी मघाशी फोनवर रागावलं, म्हणुन?

"नाही"

"तुला रक्ताची भिती वाटली का?"

"नाही"

"नविन साडी खराब झाली म्हणुन ?"

"नाही."

"अगं मग झालं तरी काय?"

"आता तरी तुम्ही माझ्याशी अबोला धरणार नाही ना?" तीने मुसमुसतच विचारलं. रमेशला एकदम गलबलुन आलं. त्याने तिचा चेहरा ओंजळीत धरला, तिच्या गालावरचे अश्रु पुसले अन म्हणाला,

"ए रुची, वेडी कुठली. अगं मी तुझ्यावर रागवेन का? अं ? खर सांगू ?"

"हं"

"आज मला तुझा अभिमान वाटतोय. आय अम प्राउड ऑफ यू."

"खरचं? तीने थोड्या आश्चर्यानेच विचारले.

"अगदी खरं. तुझी शप्पथ!" असं म्हणत रमेशने तिला छातीशी धरले. रामदासने मात्र तेथुन काढता पाय घेतला.

सोमवार, १५ मार्च, २०१०

धुयमाती

१४ मार्च २००६


होयीची कथा काय सांगू राजेहो
कराले गेलो एक अन झाल भलतच राजेहो.

या वर्सी होती आमची पैलीच होयी
कितीतरी अरमान होते माया मनी


म्हतलं बायकोले पैल्या होयीले
तयार रायजो माया रंगात रंगाले

बायकोबी म्हनली पाहू किती हाये कोनात दम
म्या बी म्हतलं देशमुख नाई "किसीसे कम"

होयीचा दिवस आला तसं मले भाय झ्याक वाटलं
बायकोखातर यावर्सी पहिल्यांदा पाट्यावर पुरणबी वाटलं

तुपाची गोठ निंगाली तस मले एकदम आठोलं
मांगच्या वक्ती दुकानातुन तुपच नव्हतं आणलं

म्या म्हतलं बायकोले धा मिन्टात घेउन येतो तुप
भरवतो तुले पुरनपोळीचा घास, मजा येइन खुप

त्याच्यावर बायको अशी काही लाजली
मायी इच्छाच नाही होवे तुपाले जाची

मनातल्या इच्छा मनातच ठेवल्या अन घेउन आलो तुप
रस्त्यात मले आठवत होतं बायकोच गोरपान रुप

घरी येउन पायतो तं वेगळाच रंग दिसला
बायकोसंग सायी (साळी) अन साया (साळा) होता बसला.

म्या म्हतलं इचीभन हे भलतच कसं झालं
माय नशीब आजच एकदम असं कसं फुटलं

बायकोले रंग लावाचे सपन सपनच रायले
नस्त्या वक्ती हे दोघं कायलेच आले.

दुस-या दिवशी लौकर उठुन कलर लावाच ठरवलं
तवाच मले रात्री झोपेनं कवेत घेतलं

पायटे उठुन पायलं तं साया घोरत होता,
बायको सडा टाकत होती, मले चान्सच भेटला.

पुडीतला कलर हातात घेतला, थोडसं पानी टाकुन मस्त भिजवला,
मागुन जाउन बायकोच्या गळ्यात हात टाकला,

धा रुपयाचा अख्खा कलर तिच्या चेह-याले घुसाडला,
अन कशी दिसते पाहाले, चेहरा मायाकडं पलटवला,

मले वाटलच नव्हतं का असं काई होईन,
को-या चेह-याने बायको तिच्या मागुन येईन,

मले समजलच नाई का हे कन्फुजन कसं झालं
सायीनं बायकोची साडी नेसली हे ध्यानातच नाही आलं,

बायकोचा चेहरा असा लाल झाला,
बापजन्मी कोनी असा कलर नसन पायला,

मंग काय सांगु, काय झाली मायी हालत,
सायी होती चिडली, अन बायको होती रडत,

आता तं तिले कारणच होतं सापडलं
गुंडभर पानी माया डोस्क्यावरती उबडलं

आता काय कराव मले समजे नाई
समजवाचा चानस थे मले काई देये नाई

तिकडं सायी बी चिडली अन साया बी
देल्ला नाई चान्स पयुन जाचा बी

कलरच्या नावानं दोघान मले जो घोयसलं
थ्या दिवशी पाटलाचं पानी मीनं वयखलं

हाड नाही मोडलं, नशिब होतं चांगलं
पण वाटत होतं अजुनही बायकोच भेव,

दुपारच्याले साया-सायी गेले निगुन गावाले,
अन चानस भेटला मले बायकोशी बोलाले,

तिच्या चेह-यावर अजुनहि लाल रंग दिसत होता,
माया चेह-याचा त रंगच उडला होता,

तिच्या बहिणीनं तिची साडी नेसली
यात मायी काय चुक घडली ?

माही चुक नसताना मलेच भेवाडे,
अन समजवाले गेलो का डोळेच काढे...

शेवटी कान पकडुन "स्वारी" म्हटलं
तवा तिच्या चेह-यावर हासू दिसलं

तिले एकदम का सुचल काय म्हायित,
झट्कन उठुन थे आतमधं गेली


कवा तिनं गुलाल आणला पताच नाही लागला,
अन माह्या चेहरा लालेलाल करुन टाकला

मलेबी मंग असा जोश चढला
मीनंबी तिचा चेहरा मस्त रंगवुन काढला,

रातच्याले जवा तिनं भरवला घास पुरणपोळीचा,
समजला अर्थ मले बायकोच्या प्रेमाचा.